पैठण : अवैध वाळू उत्‍खननासाठी लाच; तहसीलदारांवर गुन्हा दाखल - पुढारी

पैठण : अवैध वाळू उत्‍खननासाठी लाच; तहसीलदारांवर गुन्हा दाखल

पैठण ; पुढारी वृत्तसेवा

पैठण येथील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अवैद्य मार्गाने वाळू उत्खनन करण्याच्या परवानगीसाठी १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. घटनेच्या दिवसांपासून तहसीलदार चंद्रकांत शेळके कार्यालयामध्ये गैरहजर असल्याचा ठपका ठेवून जिल्हा अधिकारी सुनील चव्हाण यांनी पैठण येथील तहसीलदार म्हणून श्यामसुंदर धुळधर यांना तात्काळ पदभार घेण्याचा आदेश दिला आहेत. तहसीलदारांवर गुन्हा दाखल झाल्‍याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अवैध मार्गाने वाळू उत्खनन करण्यासाठी एका वाळू व्यावसायिकाकडून त्यांचा खासगी इसम नारायण वाघ मार्फत १ लाख तीस हजार रुपयांची मागणी केली, असा आरोप आहे.

त्‍यामुळे औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या दरम्यान सोमवार रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी तहसील कार्यालयाची झाडाझडती घेऊन येथील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते.

शनिवार दि. २३ ऑक्टोबर या घटनेच्या दिवसांपासून तहसीलदार चंद्रकांत शेळके हे कार्यालयात गैरहजर आहेत. त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्यामुळे व सध्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी पडझड संदर्भातील लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम रेंगाळले आहे.

त्यामुळे तहसीलदार पदावर पुढील आदेश येईपर्यंत प्रभारी तहसीलदार म्हणून श्यामसुंदर धुळधर यांच्याकडे पदभार देण्याचा आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पैठण- फुलंब्री उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे यांना दिला.

त्‍यावरून तात्काळ पदभार घेतल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान पैठण तहसील कार्यालयामध्ये एवढी मोठी कारवाई होऊन देखील व महसूल विभागात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाची आदेश पत्रांमध्ये उल्लेख नाही.

तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यावर मुख्यालयात अनुपस्थित असल्याचा ठपका आदेश पत्रात ठेवण्यात आल्यामुळे महसूल विभागात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button