Murder : नांदेडमध्ये प्रेमभंगातून भरदिवसा तरुणीचा खून - पुढारी

Murder : नांदेडमध्ये प्रेमभंगातून भरदिवसा तरुणीचा खून

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : Murder : प्रेमभंग झाल्यामुळे एका तरुणाने भरदिवसा घरात घुसून तरुणीची धारधार शस्त्राने गळा चिरून खून केला. रविवारी (दि. २४) दुपारी शहरातील शारदानगर येथे ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, शारदानगरातील झेंडाचौक परिसरात डॉ. हरदळकर यांच्या घरात राहणारी वैष्णवी संजयसिंह गौर (वय २२) ही तरुणी आणि देवीदास शेंडगे (२६) या तरुणामध्ये प्रेमसंबंध होते. पण काही दिवसांपासून दोघांमध्ये काही कारणामुळे दुरावा निर्माण झाला. प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने सुरेश याने वैष्णवी घरी एकटीच असल्याची संधी साधत रविवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास तिच्या घरात घुसून शस्त्राने गळा चिरून तिचा खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख, विमानतळ ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, सपोनि आनलदास आदींनी घटनास्थळ गाठले.

आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला अटक केली. वैष्णवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून घटनास्थळावरून पोलिसांनी दोघांचे मोबाईल जप्त केले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button