औरंगाबाद : बिडकीनच्या ६१ भाविकांची ऑनलाईन फसवणूक | पुढारी

औरंगाबाद : बिडकीनच्या ६१ भाविकांची ऑनलाईन फसवणूक

बिडकीन (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा

तिरुपती बालाजी देवस्थानचे बनावट पासेस देवून बिडकीनच्या 61 भाविकांची ऑनलाईन फसवणूक करणारा पोलिसांच्या गळाला लागला आहे. औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरात राहणार्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तब्बल 15 हजार रुपये त्याने भाविकांकडून उकळले होते. दर्शन रांगेत लागण्यापूर्वीच त्यांची पास बनावट असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाने सांगितले. त्यामुळे भाविकांना विनादर्शन परत यावे लागले होते.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. ५ रोजी बिडकीन तक्रारदार यांनी पोलिस ठाणे सायबर येथे तक्रार दिली की, ते व त्यांचे कुटुंबिय व नातेवाईक यांना तिरूपती बालाजी देवस्थान येथे दर्शनासाठी जायचे होते. यावरून त्यांनी गुन्ह्यातील आरोपी हा ऑनलाईन जॉबवर्क करणारा असून तो वेगवेगळी ऑनलाईनची कामे करत असतो. तक्रारदार यांनी आरोपीस त्यांना तिरूपती देवस्थान येथे दर्शनासाठी ऑनलाईन पासेस काढायचे असल्याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरोपीने तक्रारदार यांच्याकडून दर्शनासाठी जाणा-या लोकांचे नाव, आधारकार्डबाबत व्हॉटसअॅपव्दारे माहिती घेतली तसेच प्रत्येकी ३०० रूपये किंमतीची दर्शनपास काढून देतो असे सांगून १५००० रूपये ऑनलाईन ट्रान्स्फर करून घेतले. तसेच काही दिवसांनंतर आरोपीने तक्रारदार यांना तुमचे तिरूपती बालाजीचे देवस्थानचे पासेस आल्याचे दि. १७ रोजी तुमचे दर्शन असल्याचे सांगून पीडीएफ स्वरूपातील पासेस तक्रारदार यांना व्हॉटसअॅपवर पाठवले.

सदरचे दर्शन पासेस घेवून बिडकीन येथील गणेश चौधरी व सोबत ६० जण तिरूपती बालाजी येथे पोहोचले व दर्शन रांगेत तिरूपती देवस्थानच्या सुरक्षा अधिकारी यांनी सदर पासेसची तपासणी केली असता त्यांनी सदरच्या पासेस बनावट असल्याचे सांगितले व त्यांना दर्शनापासून मज्जाव केला.

यावरून दर्शनासाठी बिडकीन येथून गेलेल्या ६१ लोक तिरूपती बालाजी येथून दर्शनाविना बिडकीन येथे परत आले. त्यांनी लगेच याबाबत सायबर पोस्टवर नमूद प्रमाणे तक्रार दिली असता त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाणे औरंगाबाद ग्रामीण येथे गुरनं. १२/२०२१ कलम ४२०, ४६५ भादविसह कलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर पोलीस या गुन्ह्याचा बारकाईने तपास करून फिर्यादी यांनी केलेल्या व्यवहाराचे व तिरूपती देवस्थान यांनी दिलेल्या दर्शन पासेसबाबत अभिप्रायावरून आशिष नारायण गुनाले (वय २२, रा. गजानननगर, गारखेडा, औरंगाबाद) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला औरंगाबाद शहर परिसरातून सायबर पथकाने ताब्यात घेतले. संशयीत आरोपीची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण सायबर पोलीसांनी मिळालेले पुरावे समोर ठेवताच संशयीत आरोपी आशिषने गुन्हाची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेले संगणक, कलर प्रिंटर, स्कॅनर, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

Back to top button