बीड : खदानीत बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू  | पुढारी

बीड : खदानीत बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू 

बीड ; पुढारी वृत्‍तसेवा : केज तालुक्यातील साळेगाव येथील खदानीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

शेतातील खदानीत दोन मुले बुडाली.

या विषयी अधिक माहिती अशी की, (शुक्रवार) सायं ४:३० वाजण्याच्या सुमारास साळेगाव येथील दस्तगीरचा माळ नावाच्या भागात इंगळे यांच्या शेतातील खदानीत दोन मुले बुडाली.

प्रकाश बबन शिंदे व अनिल बबन शिंदे वय अनुक्रमे ८ व १० वर्षे ही पारधी समाजातील दोन सख्खी भावंडे खेळत असताना पाण्यात पडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव, पोलीस कर्मचारी अशोक नामदास, धनपाल लोखंडे, अमोल गायकवाड, शिवाजी शिनगारे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.

स्थानिक रहिवाशी व पोलीस तपासात वेळोवेळी मदत करणारे बाळकृष्ण घुले, बापू गिते व रामदास गिते यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

त्या नंतर उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही शव हे उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठविण्यात आले आहेत.

अधिक वाचा : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच दर्शन

Back to top button