हिंगोली: दोन कारची समोरासमोर धडक ; १ ठार, ७ जण जखमी | पुढारी

हिंगोली: दोन कारची समोरासमोर धडक ; १ ठार, ७ जण जखमी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ ते जवळाबाजार मार्गावर वगरवाडी शिवारात दोन कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण ठार तर ७ जण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.५) रात्री घडली. फहीमोद्दीन कादरी (वय ५२, रा. कळमनुरी) असे मृताचे नाव आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळमनुरी येथील फहीमोद्दीन कादरी हे त्यांच्या कुटुंबियांसह परभणी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम आटोपून परत येत होते. यावेळी जवळाबाजार ते औंढा नागनाथ मार्गावर वगरवाडी शिवारात समोरून भरधाव येणार्‍या कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यात फहीमोद्दीन यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक सतीष तावडे, जामदार राजू ठाकूर, सुर्यकांत भारशंकर, अंबादास बेले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या अपघातात जखमी झालेल्या मोहम्मदी कादरी (वय ४५), बुशरा कादरी ( वय २५), जैबूंनीसा कादरी (वय ७०), सय्यद युनूस (वय ६०), तसेच जलालदाभा येथील विनोद काळे (वय २३), सतीश हाके (वय २३) व पेडगाव परभणी येथील ज्ञानेश्वर हाके (वय २४) यांना तातडीने उपचारासाठी औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

जखमींपैकी मोहम्मदी कादरी, जैबूंनीसा कादरी व बुशरा या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा 

Back to top button