हिंगोली : १.१४ कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह ९ जण ताब्यात | पुढारी

हिंगोली : १.१४ कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह ९ जण ताब्यात

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ पोलिसांनी १.१४ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून याप्रकरणी ९ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये औरंगाबाद येथील एका महिलेसह खामगावच्या तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी फरार असणाऱ्या दोघांचा शोध सुरु केला असून, १० लाख रुपये किंमतीच्या खर्‍या नोटांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी औढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद येथील एका महिलेची नांदेड व लातुर येथील विनोद शिंदे, केशव वाघमारे, विलास वडजे, सोमनाथ दापके, सुनील जगवार या पाच जणांसोबत एका संस्थेच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यांनी महिलेस १ लाख रुपयांचे ३ लाख रुपये करुन देतो, असे आमिष दाखविले. महिलेने त्यासाठी १० लाख रुपये सोबत घेऊन बुधवारी थेट नांदेड गाठले. त्या ठिकाणी उतरल्यानंतर महिला एका वाहनाने औंढा नागनाथकडे निघाली होती. तर 40 लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन खामगाव येथून पाच जण गाडीने औंढा नागनाथकडे आले होते. औंढा नागनाथ येथील उपबाजार समितीच्या आवारात महिलेने जवळील १० लाखांच्या नोटा आरोपींना दिल्या. त्याबदल्यात गाडीतील व्यक्तींनी ४० लाखांच्या नोटांची बॅग महिलेकडे दिली. त्यानंतर ते फरार झाले.

दरम्यान, औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वानाथ झुंजारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अफसर पठाण, जमादार संदीप टाक, रवी हरकाळ, अमोल चव्हाण हे गस्त घालत असताना ही महिला त्यांच्या निदर्शनास आली. संशयस्पद  वाटल्याने या महिलेकडे विचारणा केली असता तिने आपली फसवणुक झाल्याचे पोलिसांना सांगितले. तिला देण्यात आलेल्या ४० लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटांची बॅग दाखवली. या प्रकरणाची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांची नाकेबंदी करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

नाकेबंदीमध्ये पथकाने वाहनासह ज्ञानप्रकाश परमेश्वर जांगीड, लखन गोपाल बजाज, राहुल चंदुसिंग ठाकूर (सर्व रा. खामगाव) यांना ताब्यात घेतले. व्हिडीओ कॉलिंगवरून त्यांची ओळख पटल्यानंतर खामगाव पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात ७५ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा व बनावट सोने सापडले. त्यानंतर आज ( दि. २ ) पहाटेच औढा पोलिसांच्या पथकाने खामगाव येथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी नऊ जणांची चौकशी सुरु असून औढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरीत दोघांसह 10 लाख रुपयांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

  हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button