लातूर : स्मशानभूमीत महिलांनी साजरी केली संक्रांत; वाण म्हणून वाटली पुस्तके | पुढारी

लातूर : स्मशानभूमीत महिलांनी साजरी केली संक्रांत; वाण म्हणून वाटली पुस्तके

निलंगा, पुढारी वृत्तसेवा:  स्मशानभूमी म्हटले की पटकन समोर येणारा भीती अन् भूत परंतु माकणी थोर येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी गावातील सुमारे ३०० महिलांनी स्मशानभूमीत जाऊन मकरसंक्रांत साजरी केली. एकमेकींना हळदी कुंकू लावत तीळगूळ देऊन या सणाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे वाण म्हणून महापुरुषांचे विचार असलेले समाजोपयोगी पुस्तके त्यांनी दिले. या अनोख्या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

निलंगा येथील शांतीवन ग्रुपचे काम पाहून गावातील काही ज्येष्ठ व तरुणांनी एकत्र येत स्मशानभूमी परिसर साफसफाई करण्याचे काम हाती घेतले व त्यांचे नंदनवन हे नामकरण केले आहे. दर रविवारी चाळीस ते पन्नास तरुण व ज्येष्ठ नागरिक एकत्रित येऊन मोफत श्रमदान करतात. हे काम पाहून गावातील व बाहेरील अनेक दात्यांनी या सामाजिक उपक्रमास निधीच्या माध्यमातून मोठा हातभार लावला यात प्रामुख्याने तानाजी गुरुजी माकणीकर, माधव नरसिंग सूर्यवंशी यांचे विशेष योगदान आहे. आजतागायत संपूर्ण परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली असून, सुमारे पन्नास ते साठ ब्रास पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत, जवळपास परिसरात बसण्यासाठी ५० ते ६० बेंचेस उपलब्ध झाले आहेत. हळदी कुंकू कार्यक्रमासाठी गावातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे मोठी गर्दी केली होती. या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

स्मशान भूमीबद्दल असलेल्या अंधश्रध्दा दूर करणे, मनातील भीती दूर करणे या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला. त्यास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यापुढेही असे उपक्रम घेणार आहोत.
– मधुकर सूर्यवंशी माजी सरपंच माकणी थोर

Back to top button