औरंगाबाद : राष्ट्रवादीपुढे बंडखोरीचे संकट; काळेंविरुद्ध सोळुंकेंची उमेदवारी कायम | पुढारी

औरंगाबाद : राष्ट्रवादीपुढे बंडखोरीचे संकट; काळेंविरुद्ध सोळुंकेंची उमेदवारी कायम

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विरोधात पक्षाचे जुने पदाधिकारी प्रदीप साळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपुढे बंडखोरीचे संकट निर्माण झाले असून, त्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.

सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर मराठवाडा शिक्षक मतदार संघात निवडून येणारे आमदार विक्रम काळे यांना यंदा पक्षाचेच जुने पदाधिकारी साळुंके यांनी आव्हान दिले आहे. यापूर्वीच्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती, परंतु संधी नाकारण्यात आली होती. यंदा पक्षाकडून उमेदवारी मिळेल म्हणून त्यांनी उमेदवारी दाखल केला होता. परंतु, पुन्हा डावलण्यात आल्याने साळुंके यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली.

सोमवारी (दि. १६) दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. पक्षाने साळुंके यांना वारंवार उमेदवारी मागे घेण्याची सूचना केली. मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्यांची हकालपट्टी केली आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पक्षासाठी काळेंचे योगदान काय : सोळंके

पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. मराठवाडा शिक्षक मतदार संघातून विक्रम काळे हे १४ वर्षे आमदार आहेत. कुठे पक्ष वाढविला, कुठे पक्ष बांधणी केली, हे त्यांनी दाखवून द्यावे. त्यांनी दाखवून दिल्यास मी निवडणूक लढणार नाही. आता प्रत्येक तालुक्यात मी फिरणार असून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवित असल्याचे प्रदीप सोळुंके यांनी सांगितले.

Back to top button