पैठण : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून | पुढारी

पैठण : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

पैठण पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशय घेणाऱ्या पतीने पत्नीला फावड्याच्या दांड्याने मारहाण करून भर रस्त्यात तिचा खून केल्याची घटना पैठण शहरातील नेहरू चौकात घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेचे नाव मंदा ज्ञानेश्वर पौळ (वय २८ रा. नवनाथ मंदिर गल्ली पैठण) असे आहे.

याबद्दलची अधिक माहिती अशी की, मंदा ज्ञानेश्वर पौळ या पैठण शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करत होत्या. या महिलेचे पती ज्ञानेश्वर कुंडलिक पौळ याच्या सोबत गेल्या तीन वर्षापासून घरगुती भांडण सुरू होते. त्यामुळे हे पती-पत्नी विभक्त राहत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सात वाजता दवाखान्यात कामाला जाण्यासाठी घरून निघाल्या होत्या. नेहरू चौकाच्या भागात पत्नीला कायमस्वरूपी संपवून टाकण्याच्या उद्देशाने तिच्या मार्गावर फावड्याचा दांडा घेऊन पत्नीची वाट पाहत बसला होता. ती जात असताना अचानक भर रस्त्यावर त्याने फावड्याच्या दांड्याने वार करून तिला ठार मारले. उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने जखमी झालेल्या महिलेला पैठण शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांना तीन अपत्ये आहेत.

पती नेहमी चारित्र्यावर संशय घेत असल्याचे नातेवाईकाचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ भेट दिली. खून करून फरार झालेला पतीला अटक करण्यासाठी विशेष पथक नेमून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा

Back to top button