नागपूर ते औरंगाबाद तीन तासांचा प्रवास अद्याप स्वप्नवतच | पुढारी

नागपूर ते औरंगाबाद तीन तासांचा प्रवास अद्याप स्वप्नवतच

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र, आता उद्घाटन होत असले तरी औरंगाबाद ते नागपूरला तीन तासांत ये-जा करणे अद्याप स्वप्नवतच आहे. नागपूरला जाण्यासाठी जुनाच मार्ग वापरावा लागत असल्याने व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिकांना सुमारे दहा तास कंटाळवाणा प्रवास करण्याचा जाच सहन करावा लागत आहे. येत्या 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.

नागपूर ते मुंबई या 701 कि.मी. अंतरापैकी नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन दीड महिना उलटला आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना व औरंगाबाद या जिल्ह्यांमधील अंतर कमी होऊन वाहतूक सुसाट होणार असल्याने हा महामार्ग कधी सुरू होतो, याची सर्वांना प्रतीक्षा होती. गेल्या दोन वर्षांत समृद्धी महामार्गाचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन करण्यासाठी अनेकदा मुहूर्त काढण्यात आले. मात्र, विविध कारणांनी ते लांबणीवर पडत होते. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु होण्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शासनाला व्याजाचा भुर्दंड

नागपूर ते शिर्डी व्हाया औरंगाबाद हा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. उद्घाटनापूर्वी या महामार्गावर प्रवासासाठी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैजापूर येथून या महामार्गाने अवघ्या तासाभरात औरंगाबादेत पोहोचले होते. रस्ते विकास महामंडळाने केवळ मुख्यमंत्र्यांसाठी सुरू केलेला हा महामार्ग पुन्हा बंद केला आहे. नागपूर ते औरंगाबादपर्यंतच्या कामासाठी भूसंपादनासह सुमारे 15 हजार कोटी रुपयांवर खर्च आला आहे. कर्जरोखे काढून रस्त्याचे काम करण्यात आले असून टोलचे उत्पन्न बुडत असल्याने शासनाला व्याजाचा भुर्दंड मात्र सहन करावा लागत आहे. जुन्या रस्त्याने औरंगाबादहून नागपूरला जाण्यासाठी पाचशे कि.मी.चा सुमारे 10 तासांचा दगदगीचा प्रवास करावा लागतो. ट्रॅव्हल्स एजन्सीकडून या प्रवासासाठी 1200 ते 1500 रुपये आकारले जातात. दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात या प्रवासासाठी दोन हजार रुपये वसूल केले जातात. त्यामुळे हा महामार्ग तत्काळ खुला करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

जुन्या रस्त्यावर बायपास नावालाच

औरंगाबाद – नागपूर या सध्याच्या रस्त्यावर वाहनधारकांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी रस्ता खचून त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. जालना येथे तयार करण्यात आलेला बायपास आता गावातच आला आहे. पुढे देऊळगाव राजा, खामगाव, चिखली या शहरांना बायपास आहे, पण तो नावालाच असल्यासारखा आहे.

उद्योजक, व्यापार्‍यांच्या वाहतूक खर्चात वाढ

नागपूर हे अनेक मोठ्या कंपन्यांचे लॉजिस्टिक हब असल्याने उद्योजकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. मालवाहतूकदार माल पोहोचविताना रस्त्याचे अंतराबरोबरच डिलिव्हरी देण्यासाठी किती दिवस लागतात, हे ठरवून भाडे आकारत असतात. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर या मार्गावर माल वाहतूक करणे सध्या खर्चीक ठरत आहे. समृद्धी महामार्ग खुला झाल्यास प्रदूषणमुक्त वाहतूक होण्याबरोबरच कोंडीचा प्रश्न संपुष्टात येईल. राज्याची उपराजधानी व पर्यटन राजधानी यांच्यातील अंतर अवघ्या तीन तासांवर येऊन उद्योग, व्यापाराला चालना मिळेल, असे उद्योजक आशिष गर्दे यांनी सांगितले.

Back to top button