औरंगाबाद : दहेगावात विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांवर गुन्हा - पुढारी

औरंगाबाद : दहेगावात विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांवर गुन्हा

औरंगाबाद; पुढारी वृत्‍तसेवा : पिशोर तालुक्यातील दहेगावात (२३ वर्षीय) विवाहितेची आत्‍महत्‍या झाल्याची घटना घडली आहे. सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू, सासऱ्या विरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेची आत्महत्या झाल्‍याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिशकुमार बोराडे यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास परिसरातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याबाबत पिशोर पोलिसांना माहिती मिळताच बोराडे यांनी साथीदारांसह घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने महिलेस बाहेर काढले.

सदरील महिला ही गावातील असून त्‍यांचे नाव वैशाली वाणी असल्याचे निष्पन्न झाले. वैशाली यांचा मृतदेह चिंचोली लिंबाजी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला.

डॉक्टरांनी त्‍यांची तपासणी करून त्‍यांना मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूची वार्ता कळताच माहेरच्या मंडळींनी आक्रोश केला व आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

प्रसंगावधान राखत पोलिसांनी पती, सासू व सासरा यांना ताब्यात घेतले. विवाहितेचा भाऊ सुरेश पांडुरंग दुधे यांनी फिर्याद दिल्यावरून पती संदीप दगडू वाणी, सासरा दगडू वाणी व सासू देऊबाई वाणी यांच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथील पांडुरंग दुधे यांची कन्या वैशाली व कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील दगडू वाणी यांचा मुलगा संदीप यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्न झाल्याच्या काही महिन्यांपर्यंत सासरच्यांनी वैशालीला चांगली वागणूक दिली. नंतर वेळोवेळी तिचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. त्रास असह्य झाल्याने वैशालीने आत्महत्येचा मार्ग पत्करला असे फिर्यादीत नमूद केले आहे. मृत वैशालीच्या पश्चात एक वर्षाचा मुलगा आहे.

Back to top button