गद्दारांनी भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन दाखवावे : उद्धव ठाकरे | पुढारी

गद्दारांनी भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन दाखवावे : उद्धव ठाकरे

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : तुमच्यात हिंदुत्व शिल्लक असेल; तर महाराष्ट्रात जे चाललेय ते आम्हाला पसंत नाही, असे जाहीर करा आणि सरकारमधून बाहेर पडा, असे सांगत बाळासाहेबांचा पक्ष आणि नाव पाहिजे असणार्‍या गद्दार आमदारांनी भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले.

शनिवारी सायंकाळी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत, डॉ. नीलम गोर्‍हे, खा. अरविंद सावंत, विनायक राऊत, आ. नितीन देशमुख आदी शिवसेना नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी विदर्भातील या पहिल्याच जाहीर सभेत शिवसेनेच्या बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल करत शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले, राज्यातील शेतकर्‍यांना पीक विमा, अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. शेतकर्‍यांचे प्रश्न वार्‍यावर सोडून राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिषांना स्वतःचे हात दाखवत फिरत आहेत. आजच नवस फेडण्यासाठी ते 40 रेड्यांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. राज्याचे उद्योग बाहेर पळवले जात आहेत. महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा वारंवार अवमान केला जात आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान करून त्यांचा आदर्श मिटवण्याचा प्रयत्न होत आहे. ठाकरे म्हणाले की, गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उद्योग तिकडे पाठवत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातील गावांवर हक्क सांगत आहेत. पुढील वर्षी कर्नाटकची निवडणूक होत आहे. त्यासाठी उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडेही करेल. शिंदे गप्प बसतील. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठोबालाही कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार. हे महाराष्ट्र मुळीच सहन करणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले, भाजप हा आता आयातांचा पक्ष झाला आहे, त्यांचे विचार संपले आहेत. आयात पक्षाची दादागिरी, हुकूमशाही मर्द मावळ्यांना फोडू शकणार नाही. राज्यपालांकडून सारखी अवमानकारक वक्तव्ये होत असतानाच मिंधे सरकार एवढे गप्प का? गो-बॅक म्हणून आतापर्यंत त्यांना परत पाठवायला हवे होते.

राज्याचा कृषिमंत्री महिलांचा अपमान करतो. मी मुख्यमंत्री असतो, तर त्याला लाथ मारून हाकलले असते, असे म्हणून त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर हल्ला चढविला. वाशिमच्या ताईला शिवसेनेने पाचवेळा खासदार केले; पण ‘ईडी’चा ससेमिरा मागे लागताच मोदींना राखी बांधून ताईने बचाव करून घेतला, असा टोला भावना गवळी यांना त्यांनी लगावला. यावेळी खा. राऊत यांचेही भाषण झाले.

Back to top button