परभणी : पाथरी येथे घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

परभणी : पाथरी येथे घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

पाथरी; पुढारी वृत्तसेवा : येथे घराफोडी करत चोरट्यांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना आज (दि.२०) पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथरी शहरातील नरसिंहनगर येथे दिगंबर हरिकिशन घाटे हे संतोषकुमार देशमुख यांच्या घरी भाड्याने राहतात. दिगंबर घाटे शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान जेवण करून सहकुटुंब हॉलमध्ये झोपले होते. आज पहाटे पाच वाजता ते मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी निघाले. यावेळी बेडरूम आतून लॉक केल्‍याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी व त्यांच्या पत्नीने दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडून कपडे व बॉक्स बाहेर फेकल्याचे दिसून आले.

पुतण्या दीपक दत्ता घाटे याच्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सच्या फीसाठी ठेवलेले २ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे 59 ग्रॅम वजनाचे गळ्यातील  गंठण, 23 ग्रॅमचा नेकलेस, १ ग्रॅमच्या ७ अंगठ्या, ३ ग्रॅमचा ओम, तर चांदीचे फुलपात्र, दोन वाटी, वाळे, पायातील तोडे असा 250 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

शेजारच्‍या घरातील ४० हजार लंपास

दिगंबर घाटे यांच्या शेजारी राहणारे घरमालक संतोष देशमुख यांच्याही घरामध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी दिगंबर घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखंडे करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button