बुलडाणा : आदित्य ठाकरेंच्या बुलडाण्यातील सभास्थळाला परवानगी नाकारली | पुढारी

बुलडाणा : आदित्य ठाकरेंच्या बुलडाण्यातील सभास्थळाला परवानगी नाकारली

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सोमवारी बुलडाण्यात गांधी भवन परिसरात सभा आयोजित केली आहे. परंतु, त्यांच्या सभास्थळाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.
तसे पत्रच पोलीस विभागाकडून आयोजकांना देण्यात आले. शिंदे गटाचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय या परिसराजवळ असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असे कारण दाखवत
पोलीस प्रशासनाकडून नियोजित सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.

बुलडाणा शहरातील गांधी भवन हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जाहीर सभांसाठी ते प्राधान्याने निवडले जाते.
त्यानुसार ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मागण्यात आली. या नियोजित सभेचा धसका
विरोधी शिंदे गटाने घेतला असल्यानेच राजकीय दबावाखाली सभा नाकारण्याचे काम केले जात आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्यांनी केला आहे.

यापूर्वी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मुक्ताईनगरमधील सभेलाही ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आली आणि त्यांना जळगावमध्येच रोखण्यात आले. अंधारे यांच्यावर नजर ठेवण्यासाठी तब्बल 500 पोलीस तैनात होते.

Back to top button