गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः दैनावस्था झाली आहे. शहरातील नागरिक आशिष भारत तमखाने या सुजाण नागरिकाने दत्त मंदिर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे स्वखर्चाने बुजवत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची लक्तरे काढली आहेत. या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील दत्त मंदिर ते परळी नाक्यापर्यंतची शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दैनावस्था झाली आहे. या महामार्गावरून ये-जा करताना चंद्रावरील खड्ड्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मागील महिनाभरातील पावसामुळे तर राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांची अवस्था अधिकच भीषण झालेली आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला याबाबत सोयरसुतक नसल्याने नागरिक व प्रवासी वैतागले आहेत.
दरम्यान, शहरातील सुजाण नागरिक आशिष भारत तमखाने यांनी दत्त मंदिर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर स्वखर्चाने खड्डे बुजवत प्रशासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणला आहे. किमान या घटनेनंतर तरी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व प्रशासन खडबडून जागे होते की कुंभकर्ण झोपेतच राहते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचलंत का ?