नांदेड: शेतीपूरक साहित्य दुकान आगीच्या विळख्यात; ५० लाखांचे नुकसान | पुढारी

नांदेड: शेतीपूरक साहित्य दुकान आगीच्या विळख्यात; ५० लाखांचे नुकसान

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नवा मोंढा येथे शेतीपूरक साहित्य विक्रीच्या दुकानाला शनिवारी मध्यरात्रीनंतर अचानक आग लागून या दुकानातील सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका दुकानाला प्रथम आग लागली. या आगीचे लोट या दुकानात शिरल्यानंतर आगीचा भडका उडाला. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे चार तास लागले.

स्वाती विवेक चिद्रावार यांचे विवेक एजन्सीज या नावाचे ठोक व किरकोळ शेतीपूरक साहित्य विक्रीचेदुकान आहे. त्या दुकानामध्ये शेतीसाठी उपयुक्त साहित्य होते.रब्बी हंगामाला सुरुवात होत असल्याने चिद्रावार यांनी शेतीसाठी लागणार्‍या साहित्यांचा मोठा साठा उपलब्ध करून ठेवला होता. या दुकानाची रुंदी 50 तर लांबी 70 फूट असून सात – आठ मीटर उंचीचे टीनशेडचे दुकान आहे. या दुकानाच्या पाठीमागील भागात संगीता सुनील राखे यांचे मंगलम ट्रेडर्स या नावाने प्लास्टिक साहित्य (युज अ‍ॅण्ड थ्रो) विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री सर्वप्रथम या दुकानात आग लागली. प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीचा लगेच फडका उडाला आणि विवेक एजन्सीज्च्या पाठीमागून ही आग या दुकानात शिरली. दोन्ही दुकानामध्ये प्लास्टिकचे साहित्य असल्याने आग विझविताना मोठे अडथळे येत होते.

आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर विवेक चिद्रावार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अग्निशमन दलाची एक गाडी आग विझवत होती. परंतु आगीचे तांडव पाहता आणखी तीन गाड्या मागविण्यात आल्या. तसेच एमआयडीसीचे एक वाहन, पोर्टेबल पम्प आणि दोन टँकरच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात झाल्यानंतर तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

विवेक एजन्सीज् आणि मंगलम् ट्रेडर्स या दुकानाच्या मागील बाजूस रहिवासी इमारती आहेत. मात्र अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणत या इमारतींपर्यंत आग पोहचू दिली नसल्याने जिवितहानी टळली. विवेक एजन्सी या दुकानाला मागून आग लागल्याने ती आटोक्यात आणण्यास अडथळे येत होते. या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. हे साहित्य बाहेर काढण्यासाठी मिनी जेसीबीचा वापर करण्यात आला.

कोरोना काळात दोन वर्षे अतिशय अडचणीचे गेले होते. त्यानंतर व्यवसायाने पुन्हा नव्याने उभारी घेतली होती. खूप कष्टातून हा व्यवसाय उभा केला होता. मात्र या आगीने सर्वस्व हिरावून घेतले आहे.
– विवेक चिद्रावार

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button