हिंगोली : दुघाळ तांडा शिवारातून गांज्याची ६१ झाडे जप्त | पुढारी

हिंगोली : दुघाळ तांडा शिवारातून गांज्याची ६१ झाडे जप्त

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा तांडा शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका शेतातून तीन लाख रुपये किमतीची गांज्याची 61 झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी एका शेतकऱ्या विरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात (मंगळवार) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, औंढा तालुक्यातील दुघाळा तांडा शिवारामध्ये एका शेतात गांजाची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार सुनील अंभोरे, राजू ठाकूर, प्रशांत वाघमारे, किशोर सावंत, संभाजी लकुळे, नितीन गोरे, शेख जावेद, ज्ञानेश्वर सावळे, आकाश टापरे यांच्या पथकाने मंगळवार दुपारपासूनच दुघाळा तांडा शिवारात शोध मोहिम सुरू केली होती.

यामध्ये विष्णू शंकर जाधव या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांज्याची झाडे असल्याचे आढळून आले. या ठिकाणी 61 झाडे आढळून आली असून, त्याची किंमत तीन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सर्व झाडे उपटून जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात शेतकरी विष्णू जाधव याच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा :  

Back to top button