परभणी : पोलीस कर्मचारी बेपत्ता; आत्महत्या करण्याचा स्टेटस व्हायरल | पुढारी

परभणी : पोलीस कर्मचारी बेपत्ता; आत्महत्या करण्याचा स्टेटस व्हायरल

परभणी, पुढारी वृत्तसेवा : पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हे वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी झालेल्या वादानंतर सोमवारी (दि. २६) सकाळ पासून बेपत्ता झाले आहेत. पोलीस जमादार रफिक मुश्ताक अन्सारी असे त्यांचे नाव असून ते विशेष शाखेचे कर्मचारी आहेत. दरम्यान अपमानास्पद वागणूकीतून आत्महत्या करावीशी वाटते, अशा आशयाचा त्यांनी मोबाईलवर स्टेटस ठेवला होता. या स्टेटसने संपूर्ण पोलीस खात्यात मोठा गोंधळ उडाला आहे.

याबाबत माहिती अशी, पाथरी पोलीस ठाण्यात सकाळी साडेदहाच्या सुमारास निरीक्षक गणेश राहिरे यांनी तिरंगा रॅलीच्या बंदोबस्ताच्या नियोजनासंदर्भात कर्मचार्‍यांची बैठक घेतली. घटस्थापनेचा दिवस असल्याने शहरातही पोलीस बंदोबस्तासाठी कर्मचार्‍यांची आवश्यकता होती. याच दरम्यान पाथरी पोलिस ठाण्याचे पाच कर्मचारी मानवत येथे रेल्वे आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांना शहराच्या दुर्गादेवी मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पाठविण्यात यावे, असे निरीक्षक राहिरे यांनी जमादार रफिक अन्सारी यांना सांगितले. विशेष शाखेचे कर्मचारी असताना आणखी दुसऱ्या कामाची जबाबदारी दिल्याने अन्सारी यांनी राहिरे यांच्याशी चर्चा केली. मात्र  हे काम माझे नाही असे म्हणून या प्रकारात आपला अपमान झाल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली.

दुपारी दोनच्या सुमारास ते जेवणासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर दुपारी २.४० वाजताच्या दरम्यान त्यांनी आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवला. यामध्ये निरीक्षक राहिरे यांनी मला अपमानीत करून वाईट वागणूक दिली आहे. त्यामुळे मला आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलावेसे वाटते, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी काही वेळातच आपला मोबाईल बंद केला.

या संदर्भात राहिरे यांनी कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नसून केवळ बंदोबस्तासाठी कर्मचार्‍यांना पाठवावे, अशी सूचना दिली होती. असे स्पष्ट करीत त्यांच्या स्टेटसमुळे मानवत येथे जमादार अन्सारी यांच्या घरी व त्यानंतर परभणीतही पोलिसांना शोध घेण्यासाठी पाठविण्यात आल्याचे राहिरे म्हणाले.

हेही वाचा

Back to top button