उस्मानाबाद : ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात तुळजाभवानी देवीच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ

उस्मानाबाद : ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात तुळजाभवानी देवीच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ
Published on
Updated on

तुळजापूर; सतीश महामुनी : महाराष्ट्राचे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेने आज (दि.२६) भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी सपत्नीक घटस्थापना केली. पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.

तत्पूर्वी १७ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी देवीची सुरू झालेली यात्रा मध्यरात्री एक वाजता पूर्ण झाली, आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो, अशा जयघोषात व मंगलमय वातावरणात मध्यरात्री तुळजाभवानी देवीची मूर्ती शेज घरामधून चांदीच्या मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. हळद आणि मेन याच्या साह्याने चांदीची सिंहासनावर मूर्ती स्थापित करण्यात आली. त्यानंतर देवीला दही आणि दुधाचे अभिषेक घालण्यात आले. मानाचे नैवेद्य दाखविण्यात आले. पुन्हा सकाळी ७ वाजता देवीला दही दुधाचे अभिषेक करण्यात येऊन नित्योपचार पूजा संपन्न झाली. पुजारी शशिकांत पाटील आणि इतर सहकारी सचिन परमेश्वर, शशिकांत परमेश्वर, बब्बू सोनजी, यांनी पूजा बांधली.

सकाळी ११ वाजता घटाची मिरवणूक काढण्यात आली. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, महंत तुकोजी महाराज महंत चिलोजी महाराज, जारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंखे, उपाध्यक्ष विपिन शिंदे, तुळजाभवानी भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, तुळजाभवानी उपाध्य मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, व्यवस्थापक सिद्धेश्वर इनतुले, दत्तात्रय कुलकर्णी, किशोर गंगणे, सुधीर परमेश्वर, सचिन परमेश्वर, शशिकांत पाटील, अतुल पाटील, संजय पेंदे गोविंद लोंढे, मकरंद प्रयाग, इंद्रजीत साळुंखे,,विकास मलवा, कुमार इंगळे, गणेश रसाळ, विशाल रोचकरी, महेश चोपदार, संजय सोनजी,,जगदीश पाटील, उदय कदम, श्रीराम अपसिंगेकर, राजाभाऊ ओवरीकर, राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव यांच्यासह इतर पुजारी उपस्थित होते.

संबळाचा कडकडाट आणि जय भवानी जय शिवाजी आई राजा उदो उदो च्या जयघोषात मिरवणुकीमध्ये कुंकवाची उधळण केली. पहिल्यांदा सिंह गाभाऱ्यात तुळजाभवानी देवीचे घट बसवण्यात आले. यावेळी धान्य मानकरी प्रफुल्लकुमार शेटे यांची उपस्थिती होती. विधीवत काळी माती आणि इतर साहित्य धान्य याच्या साह्याने व धार्मिक परंपरेनुसार घटस्थापना संपन्न झाली. त्यानंतर यमाई मंदिर त्रिशूल मंदिर आणि आदिमाया आदिशक्ती येथे विधिवत घटस्थापना संपन्न झाली.

यावर्षी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार असल्याने प्रशासनाने दर्शनाची सोय केली आहे. रात्रीपासून मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जलद दर्शन करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे मार्ग निश्चित केले आहेत. सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.
मंदिर परिसरात प्रासादिक भंडाराची दुकाने चारपटीने वाढली आहेत. यावर्षी मंदिर संस्थानकडून चप्पल ठेवण्यासाठी भाविकांची केलेली व्यवस्था अपुरी असल्याचे दिसून येत आहे. चप्पल स्टँडच्या कमतरतेमुळे भाविकांची तारांबळ उडत आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news