औरंगाबाद : ऐन तारुण्यात गाठतोय म्हातारपणाचा आजार; चाळिशीतही स्मृतिभ्रंश | पुढारी

औरंगाबाद : ऐन तारुण्यात गाठतोय म्हातारपणाचा आजार; चाळिशीतही स्मृतिभ्रंश

औरंगाबाद;  राहुल जांगडे : अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंश हा आजार साधारणत: उतारवयात होतो, परंतु हाच
आजार आता वयाच्या चाळिशीतही होत असल्याने तरुणांमध्ये चिंता वाढली आहे. तज्ज्ञ म्हणतात, ‘कमी वयात
स्मृतिभ्रंश होत असला, तरी त्याचे निदान साठीनंतरच होते. मात्र, मेंदूला सतत अ‍ॅक्टिव्ह ठेवून अल्झायमरला दूर ठेवता येते. यासाठी पेपर वाचणे हा एक उत्तम पर्याय असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.

दरवर्षी 21 सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. वयोमानुसार विसराळूपणा येतोच, या गैरसमजातून बहुतांशजण विस्मृती, विस्मरण या आजाराला गांभीर्याने घेत नाहीत. या आजाराचे सुरुवातीला निदान करणे कठीण असते. वयानुसार हा आजार बळावतो.

यात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.साध्या गोष्टी विसरत असतात. एखादी गोष्ट वारंवार सांगावी लागते. तसेच नुकत्याच घडलेल्या घटनाही आठवत नाहीत. त्यामुळे दैनंदिन कामे करणे अवघड होते. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. त्याला नैसर्गिक विधीही समजत नाही. त्यामुळे स्वत:वरचे नियंत्रणही जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातदेखील स्मृतिभ्रंश होऊ शकतो. परंतु, मेंदूला अ‍ॅक्टिह ठेवणे, मॉर्निंग वॉक, व्यायाम, सामाजिक उपक्रमांत सहभाग, लोकांशी संवाद, मन प्रसन्न ठेवणे यांमुळे उतारवयातही या आजाराला दूर ठेवता येते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

ज्यांना आपला मेंदू सतत अ‍ॅक्टिव्ह ठेवायची सवय असते, जे दररोज न्यूज पेपर वाचतात, त्यातील शब्दकोडे, पझल
सोडवतात, व्यायाम करतात, विविध उपक्रमांत सहभाग ठेवतात. अशांना अल्झायमर आजार होण्याची शक्यता कमी
असते. सर्वांनाच हा आजार होत नाही. परंतु, सेवानिवृत्तीनंतर जे घरातच बसून राहतात, ज्यांच्या मेंदूला काहीच काम राहत नाही, अशांचा मेंदू सुप्त होतो. परंतु, आता तरुणांमध्येही विसराळूपणाची लक्षणे दिसून येत आहेत.
-डॉ. मेराज कादरी,
मानसोपचार तज्ञ

अल्झायमर हा हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. कमी वयात जडला, तरी याची लक्षणे साठीनंतरच दिसतात. अशावेळी म्हातारपणात असे होतेच, असे न म्हणता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बुद्धीला चालना देणारे खेळ, पेपर
वाचणे, योगा, सकस आहार, प्रसन्न व अ‍ॅक्टिव्ह राहणे, यामुळे चांगला फरक पडतो.
-डॉ. पांडुरंग वट्टमवार, मेंदुविकारतज्ज्ञ

Back to top button