बीड : सोयाबीनवर तांबेरा रोग | पुढारी

बीड : सोयाबीनवर तांबेरा रोग

धारूर; अतुल शिनगारे : तालुक्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे. सुरुवातीलाच पीक उगवत असताना शंखी गोगलगायींचा हल्ला झाला. यानंतर तब्बल महिनाभर पावसाने ओढ दिली. नंतर मोझॅकचा अटॅक झाला. या सार्‍या संकटातून उरले सुरलेल्या सोयाबीन पिकावर तांबेरा रोग पडला आहे. किती संकटांचा सामना करायचा म्हणत बळीराज हतबल झाला आहे. तांबोरा रोगाचा बंदोबस्त कसा करायचा? असा प्रश्न शेतकरी कृषी विभागाला विचारत आहेत. दरम्यान, हतबल शेतकर्‍यांनी तहसीलदार यांच्यापुढे व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु साहेबांची केबिन बंद असल्याने संतप्त शेतकर्‍यांनी त्यांच्या दालनासमोर निवेदन डकवले.

धारूर तालुक्यात सध्या सोयाबीनचे क्षेत्र मोठे असून मागील वर्षी अतिवृष्टीत झालेले नुकसान यावर्षी भरून निघेल
असे शेतकर्‍यांना वाटत होते. परंतु सुरुवातीलाच कोवळ्या पिकावर शंखी गोगलगायींचा अटॅक झाला. यातून सावरत शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केली. दरम्यान कोवळी पिके असताना पंचमी ते पोळा दरम्यान पावासाने ओढ दिली. याचे
जिल्ह्यात पंचनामे झाले, परंतु धारूर तालुक्यात एकाही मंडळाला पीकविम्याचा अग्रिम मिळाला नाही. यामुळे केवळ
धारूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर मोठा अन्याय झाला. दरम्यान, यातून थोडे- फार सोयाबीन जे वाचले त्याच्यावर सध्या तांबेरा रोग पडला आहे. सर्व शेतच पिवळे दिसत आहे. यामुळे 50 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन कमी
होणार आहे. या चिंतेने शेतकरी हैराण झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास तीन- चार संकटांनी हिरावून घेतल्याने धारूर तालुक्यात शेतकरी हतबल झाले आहेत.

धारूर, चिंचपूर, गांजपूर, हसनाबाद, आवरगाव, असोला, भागात ही परिस्थिती आहे. यामुळे कृषी विभग व तहसील
प्रशासनाने पंचनामे करावेत, आशी मागणी शेतकरी दिंगबर साखरे यांनी केली आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीकविमा काढला आहे, त्यांनी ऑनलाईन नोंद विमा कंपनीकडे करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, किसानसभेने तहसीलदार यांना तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु साहेबांची केबीन बंद होती. नायब तहसीलदार देखील हजर
नव्हते. तहसीलदार यांचे केबीन बंद असल्याने किसान सभेने तहसीलदार यांचे निवेदन त्यांच्या दालना समोर डकवले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम सिरसट, तालुकाध्यक्ष संजय चोले, दादा सिरसट व शेतकरी उपस्थित होते.

तहसीलवर अंकुश नाही

तहसील कार्यालयात पंचनाम्याची मागणी करण्यासाठी शेतकरी गेले, परंतु एकही अधिकारी उपस्थित नव्हता. यामुळे शेतकर्‍यांनी तहसीलदार यांच्या केबिन समोरच तांबेरा पडलेले सोयाबीन ठेवले. निवेदन डकवले. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. वरिष्ठांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

शेतकर्‍याच्या निवेदनाची तत्काळ दखल घेतली जाईल. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार वैयक्तिक रजेवर आहेत व दुसरे फिल्डवर गेलेले असल्याने कार्यालयात अधिकारी नव्हते. फिल्डर गेलेले अधिकारी तत्काळ कार्यालयात येत आहेत.
-दत्ता भारस्कर,
प्रभारी तहसीलदार, धारूर

Back to top button