जालना : शेतकर्‍यांची 25 लाख रुपयांची फसवणूक; जादा पैशाचे आमिष दाखवून शेतमालाची खरेदी | पुढारी

जालना : शेतकर्‍यांची 25 लाख रुपयांची फसवणूक; जादा पैशाचे आमिष दाखवून शेतमालाची खरेदी

जालना, पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांना जादा भावाचे आमिष दाखवून शेतमाल उधारीवर घेत भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील व्यापार्‍याने शेतकर्‍यांची सुमारे 25 लाखांची लूट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पारध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका भुसार मालाच्या स्थानिक व्यापार्‍याने पिंपळगाव रेणुकाईसह परिसरातील शेतकर्‍यांना जादा भावाचे आमिष दाखवीत लाखो रुपयांचा शेतमाल उधारीवर घेतला. मात्र शेतकर्‍यांचे पैसे न देताच सदर व्यापारी मागील काही महिन्यांपासून फरार झाल्याने सोमवारी रात्री शेतकर्‍यांच्या फिर्यादीवरून त्या व्यापार्‍यावर पारध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर व्यापार्‍याचे नाव दिनेश रामकिसन बलरावत असे आहे. आर्थिक फसवणूक झाल्याने अनेक शेतकरी मानसिक तणावात आहेत. मात्र सदरील व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्याकडून कुठलाच प्रतिसाद देत नसल्याने अखेर पिंपळगाव रेणुकाई येथील संतोष उल्हासराव देशमुख, संतोष गणेशराव देशमुख, संदीप सुभाषराव देशमुख, रामेश्वर विठ्ठलराव देशमुख, विठ्ठल गणेशराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून पारध पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापार्‍याने जवळजवळ 25 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पारध पोलिसांत दिनेश बलरावत याच्याविरोधाात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील वर्षी गावातील भुसार मालाचे व्यापारी दिनेश बलरावत हे मागील काही महिन्यांपासून दुकान बंद करून गावातून गायब झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेमुळे मानसिक तणावात आहेत. याबाबत पारध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-विठ्ठल देशमुख, शेतकरी, पिंपळगाव

रेणुकाई शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या पिंपळगाव रेणुकाई येथील व्यापारी दिनेश बलरावत याच्याविरुध्द शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रमेश रुपेकर हे करीत आहे.शेतकर्‍यांनी जागरुक राहुन व्यवहार करावा. फसवणूक करणार्‍या आरोपीला कडक शासन होईल, असे आमचे प्रयत्न आहे.
-अभिजीत मोरे, सहायक पोलिस निरीक्षक, पारध

Back to top button