औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : गरवारे मैदानासमोरील महावितरणच्या अधीक्षक अभियंता ग्रामीण मंडल कार्यालयात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपी अधीक्षक अभियंता प्रवीण मारोतीराव दरोली (51) हे पीडिता केबिनमध्ये येताच टेबलवर ठेवलेल्या पेपरवेटच्या आकाराच्या नग्नावस्थेतील महिलेच्या स्टीलच्या कोरीव प्रतिमेवरून हात फिरवितात आणि वाईट नजरेने बघतात, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी ते 28 फेब्रुवारीदरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, प्रवीण दरोली हा पीडितेचा वरिष्ठ अधिकारी आहे. ते एकाच कार्यालयात काम करतात. पीडितेला काही कामानिमित्त दरोलीच्या केबिनमध्ये जावे लागते. त्यावेळी ते टेबलवर ठेवलेल्या पेपरवेटच्या आकाराच्या नग्नावस्थेतील महिलेच्या स्टीलच्या कोरीव प्रतिमेवरून मुद्दाम हात फिरवायचे. तसेच, वाईट नजरेने पाहायचे. ही बाब पीडितेला अनेकदा खटकली. मात्र, त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, परंतु दिवसेंदिवस हा प्रकार वाढत गेला. वारंवार तोच प्रकार घडल्यामुळे पीडितेने अखेर एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दरोली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा आबूज अधिक तपास करत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यावर एमआयडीसी सिडको पोलिसांनी आरोपी प्रवीण दरोली यांना नोटीस बजावली. तसेच, त्यांच्या केबिनमध्ये टेबलवर ठेवलेली पेपरवेटच्या आकाराची नग्नावस्थेतील महिलेची स्टीलची कोरीव प्रतिमा जप्त केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.