लातूर : हजारोंच्या उपस्थितीत जानवळ येथील जवानाला अखेरचा निरोप | पुढारी

लातूर : हजारोंच्या उपस्थितीत जानवळ येथील जवानाला अखेरचा निरोप

लातूर, पुढारी वृतसेवा : दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात उपचारादम्यान शहीद झालेले जानवळ येथील जवान मच्छींद्रनाथ नामदेवराव चापोलकर यांना त्यांच्या जन्मगावी पंचक्रोशीसह जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी रविवारी (दि.21) अखेरचा निरोप दिला. मुलगा निरज याने पार्थिवास मुखाग्नी दिला अन् उपस्थितांचे डोळे पानावले. वीर जवान मच्छींद्र अमर रहे, भारत माता की जय या जयघोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. मच्छिंद्र श्रीनगरमध्ये कर्तव्यावर होते. पोटाचा आजार झाल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. 19 ऑगस्ट
रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

21 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने हैदराबादेत व तेथून मोटारीने जानवळला आणले गेले. दरम्यान, मच्छिंद्रनाथ यांचे मित्र, गावातील शेकडो युवक गावापासून 9 किलोमीटरवर असलेल्या नांदगाव पाटी येथे दुचाकीवरून गेले होते. तेथून त्यांनी तिरंगा रॅली काढून या लाडक्या जवानाच्या पार्थिवास त्याच्या जन्मगावी आणले.
प्रारंभी मच्छींद्र यांचे पार्थिव त्यांच्या घरी ठेण्यात आले. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी तो तिरंगा चौकात ठेवण्यात आला. चौकात विद्यार्थ्यांनी रांगोळी काढल्या होत्या. सर्वत्र राष्ट्रध्वज ध्वज फडकत होता. येथे हजारो नागरिक, विद्यार्थी, शिक्षकांनी या लाडक्या जवानाचे अखेरचे दर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रा निघाली.

अंत्यविधीस्थळी लातूर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी खा. सुधाकर श्रृंगारे, आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. विनायकराव पाटील, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम, चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे, सैनिक कल्याण कार्यालयाचे एस. व्ही. घोंगडे, जय जवान जय किसान माजी सैनिक विकास मंचचे अध्यक्ष स्य्यद शब्बीर पहीलवान, शिरूर अनंतपाळचे गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण, जानवळ रेल्वे स्थानकप्रमुख कराड, लातुररोड रेल्वे स्थानक प्रमुख रवीभूषण, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, शिवाजीराव काळे, माजी जि. प. सदस्य रोहित वाघमारे, जानवळचे सरपंच भागवत कुसंगे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पंचक्रोशीतील माजी सैनिक, सरपंच, शाळांचे शिक्षक, शासकीय अधिकारी कर्मचारी यांनीही श्रध्दासुमने अर्पण केली

अतिशय प्रतिकुल परिस्थितीशी झुंजत मच्छींंद्रचे जानवळला शिक्षण झाले होते. वडील अल्पभूधारक शेतकरी व मेंढपाळ तर आई मजुरी करते. कष्ट, विनम्रता अन इतरांबद्दल आदर या गुणांमुळे या कुटुंबाबद्दल गावकर्‍यांत स्नेह होता. मच्छींद्रच्या पश्चात पत्नी, मुलगा निरज (वय 12) व मुलगी हर्षदा (वय 10) असा परिवार आहे.

Back to top button