औरंगाबाद : कसारे खूनप्रकरणात चौघे गजाआड; अ‍ॅट्रॉसिटीची केस मागे घेत नसल्याने केला होता हल्ला | पुढारी

औरंगाबाद : कसारे खूनप्रकरणात चौघे गजाआड; अ‍ॅट्रॉसिटीची केस मागे घेत नसल्याने केला होता हल्ला

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : गायरान जमिनीच्या जुन्या वादातून 2008 मध्ये दाखल झालेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेत नसल्यामुळे डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून शेतकरी जनार्दन कोंडिबा कसारे (56, रा. साईनगर, पिसादेवी) यांचा खून केला होता. या प्रकरणात सहा आरोपींपैकी चौघांना चिकलठाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दोघे पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, अटकेतील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिवाजी महादू औताडे, गिरिजा बाळू औताडे, महादू गंगाराम औताडे आणि भरत महादू औताडे (रा. सर्व हर्सूल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बाळू महादू औताडे आणि बबन निवृत्ती रोडे हे दोघे आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली. पिसादेवीच्या साईनगरमध्ये दोन मुले, सुना व पत्नीसह जनार्दन कसारे राहत होते. त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले असून त्यादेखील त्याच परिसरात राहतात. गट क्र. 135 मधील 9 एकरपैकी आठ एकर गायरान कसारे हे मागील तीस ते चाळीस वर्षांपासून कसतात. त्यावरच त्यांची उपजीविका भागविली जाते. तेथेच आरोपी महादू औताडे याची एक एकर जमीन आहे. औताडे यांचा संपूर्ण जमिनीवर दावा आहे. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होते.

गावात पोलिसांचा फिक्स पॉइंटजनार्दन कसारे यांचा खून करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत नातेवाईक व सामाजिक संघटनांनी शुक्रवारी घाटी रुग्णालयात ठिय्या दिला. नातेवाईक मृतदेह स्वीकारण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यावर उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, शहरातील सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात, चिकलठाण्याचे निरीक्षक देविदास गात, बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, उपनिरीक्षक विशाल भालेराव यांनी नातेवाइकांची भेट घेऊन त्यांना कुटुंबीयांना 24 तास संरक्षण देण्याची व गावात पोलिसांचा फिक्स पॉइंट लावण्याचे आश्वासन दिले. तसेच, मुख्यमंत्री निधीतून मदतीसाठी तत्काळ प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता मृतदेह स्वीकारण्यात आला.

कसारे कुटुंबीयांच्या मागण्या मागील 30 वर्षांसून महसूल प्रशासनाला कसारे कुटुंबीयांनी गायरान जागेसंदर्भात निवेदने दिली आहेत, मात्र अजूनही गायरान जमिनीची नोंद, पाहणी केली नाही. 1991 च्या आधीपासून आणि त्यानंतर 1994 दरम्यान तसेच 1999 दरम्यान गायरान जमिनीवर ताबा असलेल्यांना त्यांच्या नावाने त्या जमिनीचा सातबारा देण्याची तरतूद आहे, त्यानुसार जमीन नावावर करून द्यावी, आरोपींना कठोर शिक्षा करा, कुटुंबातील कर्ता पुरुष गेला, म्हणून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार नुकसानभरपाई देऊन कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे. एकाच आरोपींवर पाच अ‍ॅट्रॉसिटी गुन्हे असल्याने हा खून खटला विशेष वकिलामार्फत जलदगती न्यायालयात चालवावा या मागण्या करण्यात आल्या.

Back to top button