औरंगाबाद : ‘बायकोला का शोधत नाही’ म्हणत पोलिसांना मारहाण | पुढारी

औरंगाबाद : ‘बायकोला का शोधत नाही’ म्हणत पोलिसांना मारहाण

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ‘तुम्ही माझ्या बायको आणि मुलाला शोधू शकत नाहीत, तर तुम्ही काय कामाचे,’ असे म्हणत तरुणाने पोलिस ठाण्यातच धिंगाणा घातला. तसेच, कटरने पोलिसांवर हल्ला केला. हा प्रकार 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मुकुंदवाडी ठाण्यात घडला. या प्रकरणी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रल्हाद किसन भंडारे (28, रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. भंडारे याने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी नोंद करून घेतली. मात्र, 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी भंडारे मुकुंदवाडी ठाण्यात गेला. पोलिस अंमलदार कैलास चव्हाण हे कर्तव्यावर होते. भंडारे याने ‘माझ्या बायकोला आणि मुलाला तुम्ही शोधू शकत नाहीत, तर तुम्ही काय कामाचे,’ असे म्हणत चव्हाण आणि होमगार्ड वाघुले यांच्यावर कटरने वार करून जखमी केले. तसेच ठाणे अंमलदार सहायक फौजदार आघाव यांनादेखील कटर दाखवून धमकावले. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Back to top button