औरंगाबाद : शेतकऱ्याला जमिनीचा वाढीव मोबदला देण्याच्या कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली | पुढारी

औरंगाबाद : शेतकऱ्याला जमिनीचा वाढीव मोबदला देण्याच्या कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली

कन्नड; प्रतिनिधी : कन्नड तालुक्यातील देवनाळा येथील शेतकऱ्याला धरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचे आदेश औरंगाबाद न्यायालयाने २०१७ ला दिले होते. पण उपविभागीय तथा दंडाधिकारी यांनी देण्यास टाळाटाळ केल्याने न्यायालयाने उपविभागीय कार्यालयातील सामानाची जप्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी कार्यालयातील खुर्च्यांसह कॉम्प्युटर व इतर साहित्य जप्त करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

देवळाणा येथील शेतकरी मच्छिंद्र शामराव गवळी यांची दोन एकर तीन गुंठे शेत जमीन २००६ ला देवळाणा पाझर तलावात संपादित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना सदरील जमिनीचा ४ लाख ६० हजार रुपये देण्यात आला होता. पण मोबदला कमी असल्याने योग्य तो मोबदला मिळावा, अशी मागणी गवळी यांनी उपविभागीय अधिकारी कन्नड यांच्याकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांनी औरंगाबाद न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने त्याची दखल घेत २०१३ ला निकाल दिला. यामध्ये गवळी यांना २९ लाख ८४ हजार १०८ रुपये ४९ पैसे वाढीव मावेजा देण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने दिला. मात्र उपविभागीय कार्यालयाने या आदेशाकडे कानाडोळा केल्याने गवळी यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ८ ऑगस्ट २०२२ ला उपविभागीय कार्यालयातील सर्व सामानाची जप्ती करावी, असे आदेश पारित केले. त्यानुसार कोर्टाचा बेलीप ए. एम. पाथरे यांच्यासह शेतकरी मच्छिंद्र शामराव गवळी व न्यायालयीन कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कार्यालयातील सामानाचा रितसर पंचनामा करून उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्या खुर्चीसह सहा वेगवेगळ्या कंपनीचे मॉनिटर, चार पीसीओ, पाच कीबोर्ड, चार प्रिंटर, दोन व्हीलचेअर यासह अन्य साहित्य जप्त केले.

हेही वाचा :

Back to top button