औरंगाबाद : पैठण येथील गोदावरी नदीत तरुणाचा मृतदेह आढळला

पैठण; पुढारी वृत्तसेवा: पैठण शहरातील नागघाट परिसरातील गोदावरी नदीमध्ये एका तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि.१६) सकाळी आढळून आला. विकी महेंद्र नाथ (रा. हरीसान, ता. धारणी, जि. अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण शहरातील नागघाट परिसरातील गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह असल्याची खबर पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळाली. त्यानंतर सहायक फौजदार संजय मदने पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गोदावरी नदीत तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले.

मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर तरुणाच्या शर्टच्या खिशामध्ये मोबाईलचे सिम कार्ड आढळून आले. त्यावरून तरुणाच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला असता त्याचे नाव व पत्ता समजला. नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हा तरुण तीन दिवसांपूर्वी जालना येथे आपल्या नातेवाईकाकडे आला होता. परंतु घरी न आल्यामुळे नातेवाईक शोध घेत होते.

दरम्यान, तरुणाच्या नातेवाईकांनी पैठण येथे येऊन शासकीय रुग्णालयात ठेवलेल्या मृतदेहाची पाहणी करून मृतदेह विकी नाथ याचा असल्याचे खात्री करून पोलिसांना सांगितले. मृत तरुण सुशिक्षित बेरोजगार होता. पैठण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Exit mobile version