बीड : विनायक मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बीड, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील गोर-गरीब, वंचितांसह मराठा समाजाच्या प्रश्नावर पेटून उठणारे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बीड शहरातील शिवसंग्राम भवन येथे ठेवण्यात येणार आहे. सोमवारी (दि.15) सकाळी 10:30 वाजता अंत्ययात्रा निघणार असून दुपारी 3:30 वाजता कॅनॉल रोडवरील सिध्दीविनायक पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अंत्ययात्रा शिवसंग्राम भवन, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कारंजा चौक, बलभीम चौक, माळवेस चौक, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक, शाहूनगर, अंबिका चौक अशी अंत्यविधी स्थळी पोचणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. अंत्यसंस्कार हे शासकीय इतमामात होणार असल्याने नातेवाईकां व्यतिरिक्त इतर कोणालाही अंत्य यात्रेदरम्यान अंत्यदर्शन घेता येणार नाही. त्यामुळे शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणीच अंत्यदर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाचवेळा आमदार तरी गावी पत्र्याचे शेड

आमदार विनायक मेटे हे अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या साथीमुळे त्यांना राज्याच्या सर्वोच्च सभागृहात बसण्याची संधी मिळाली. पुढे ते सलग ५ टर्म आमदार होते. 25 वर्षे आमदार राहिलेल्या विनायक मेटे यांच्या भावाचे बीडमध्ये घर असले तरी, शिवसंग्राम भवन आणि मोक्याच्या ठिकाणी जागा असली तरी आजही मूळ गाव राजेगाव येथे त्यांचे पत्र्याचे शेड आहे. सध्या गावी त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असले, तरी त्यांची आई आजही पत्र्याच्या शेडमध्येच वास्तव्यास आहेत.

मुलाचा घात झाला म्हणत आईचा आक्रोश

 विनायक मेटे यांच्या आई केज तालुक्यातील मूळ गावी वास्तव्यास आहेत. पाच टर्म मुलगा आमदार झाला, तरी शेणा- मातीचे घर आणि पत्र्याच्या शेडमध्ये राहणार्‍या मातेने मुलगा विनायक मेटे यांच्या अपघाताची बातमी कळताच टाहो फोडला. माझ्या मुलाचा अपघात नाही, तर घातपात आहे, म्हणत त्यांनी र्‍हदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला.

पत्नी क्लास वन अधिकारी

विनायक मेटे यांनी आमदार झाल्यानंतर स्वत: आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केले. त्यांच्या पत्नी ज्योती आनंदराव लाटकर या क्लासवन अधिकारी आहेत. त्या सध्या विभागीय सहनिबंधक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहेत. त्यांचे मेहुणे संजय आनंदराव लाटकर हे अतिरिक्त पोलीस महासंचालक (झारखंड केडर) पदावर कार्यरत आहेत. तर भाऊ रामहारी तुकाराम मेटे ( माजी सरपंच राजेगाव), भावजयी वैशाली रामहारी मेटे (माजी सभापती, केज पंचायत समिती) हेही राजकारणात कार्यरत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Exit mobile version