औरंगाबाद : ‘महाविकास आघाडी नैसर्गिक नाही’ | पुढारी

औरंगाबाद : 'महाविकास आघाडी नैसर्गिक नाही'

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी ही नैसर्गिक नाही. विपरीत परिस्थितीत ती झाली असल्याचे सांगत महाविकास आघाडी फुटीचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी (दि. 11) पत्रकारांशी बोलताना दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्र पक्षांना विश्वासात न घेता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी औरंगाबाद येथील शिवसेना नेते अंबादास दानवे यांची परस्पर निवड केल्याने पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी मात्र दानवे यांच्या नियुक्तीला मान्यता दिल्याने पटोले यांच्या विरोधातील हवा निघून गेली आहे.

विधानसभेत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते झाले. विधान परिषदेत उपसभापती शिवसेनेचा असल्याने आम्ही विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावे, ही भूमिका मांडली. मात्र त्यांनी परस्पर निर्णय घेतला. त्याला आमचा विरोध आहे. आम्ही अजूनही चर्चा करायला तयार आहोत; परंतु चर्चा करायची का नाही, हा शिवसेनेचा प्रश्न आहे, असे पटोले म्हणाले.

ते म्हणाले, पहाटेचे सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार हे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे गेले आणि किमान समान कार्यक्रम देऊन महाविकास आघाडी निर्माण झाली. सत्तेत हीच पदे द्या, अशी भूमिका आमची कधीही नव्हती. जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला. विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय जनतेने दिला होता. आमचीही मानसिकता होती. तुम्ही आमच्या नेत्या सोनिया गांधींकडे गेला होता. आम्ही नव्हतो आलो. कुणाला कुणासोबत जायचे, याबाबत आमची जबरदस्ती नाही.

Back to top button