औरंगाबाद बनला मंत्र्यांचा जिल्हा; शिंदे सरकारमध्ये तीन मंत्री | पुढारी

औरंगाबाद बनला मंत्र्यांचा जिल्हा; शिंदे सरकारमध्ये तीन मंत्री

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात आमदार अतुल सावे, संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतल्याने जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या पाचवर गेली आहे. रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने जिल्ह्यात दोन केंद्रीय मंत्री आहेत. मंत्र्यांचा जिल्हा म्हणून आता औरंगाबादची ओळख निर्माण झाली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघात सिल्लोड, फुलंब्री, पैठण या तालुक्यांसह औरंगाबाद शहरातील काही वॉर्डांचा समावेश आहे. जालन्याचे खासदार असले, तरी दानवे हे औरंगाबादेत वास्तव्यास आहेत. त्यामुळे औरंगाबादचेच मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे शहरातील दुसरे केंद्रीय मंत्री आहेत. महाविकास आघाडीतील रोहयोमंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाले आहे. शिवसेना फुटीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदार शिरसाट यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. त्यांना बोलावणेदेखील आले होते. आपल्या कुटुंबीयांसह मुंबईला गेलेल्या शिरसाट यांना शेवटच्या क्षणी थांबण्याची सूचना देण्यात आली. मात्र, भुमरे व सत्तार हे ग्रामीण भागातील असल्याने विस्ताराच्या पुढील टप्प्यात शिंदेगटाकडून शिरसाट यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला संधी मिळू शकते.

विधानसभेचे माजी अध्यक्ष, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, गंगापूरमधून तिसऱ्यांदा आमदार झालेले प्रशांत बंब यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले तरी महत्वाच्या महामंडळावर दोघांपैकी एकाची वर्णी लागू शकते. पुढील टप्प्यात मंत्रिपद मिळावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून बागडे यांनी फिल्डिंग लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उद्योग राज्यमंत्री असलेले आमदार अतुल सावे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून आज शपथ घेतली. उद्योगपती असलेल्या सावे यांना उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button