परभणी : येलदरीतून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग; पूर्णा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा | पुढारी

परभणी : येलदरीतून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग; पूर्णा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा

परभणी; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर – पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी / सिध्देश्‍वर जलाशयातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याद्वारे कोणत्याही क्षणी पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन पूर्णा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

येलदरी जलाशयात सोमवारी सकाळी पाणीपातळी 459.840 मीटर, पाणीसाठा 744.011 दशलक्ष घनमीटर उपलब्ध होता. या पाण्याची टक्केवारी 76.48 टक्के एवढी असून सिध्देश्‍वर जलाशयात पाणी पातळी 412.720 मीटर, पाणीसाठा 241.478 दशलक्ष घन मीटर तर पाण्याची टक्केवारी 88.42 एवढी आहे.

या प्रकल्पावरील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाला आहे. याचा थेट परिणाम हा येलदरी पाठोपाठ सिध्देश्‍वर जलाशयात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरु आहे. पाण्याची आवक ओळखून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाटबंधारे खात्याने पूर्णा प्रकल्पाच्या सिध्देश्‍वर धरणातून वक्रद्वारद्वारे कोणत्याही क्षणी पाणी पूर्णा नदीच्या पात्रात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नदी काठच्या ग्रामस्थांनी सतर्क रहावे, नदीपात्रात कोणीही उतरू नये, जनावरे सोडू नये, जिवीत व वित्त हानी होणार नाही, या दृष्टीकोनातून सतर्क रहावे, असे आवाहन पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button