बीड : बंदूकीचा धाक दाखवून चोरी; 9 लाखांच्या रोकडसह ५ तोळे सोने चोरीला | पुढारी

बीड : बंदूकीचा धाक दाखवून चोरी; 9 लाखांच्या रोकडसह ५ तोळे सोने चोरीला

नेकनूर (बीड); पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील वडवाडी येथे पिस्तूलाचा धाक दाखवून नऊ लाख रूपये रोख व पाच तोळे सोने चोरून नेले. धाडसी चोरीची ही घटना गुरुवारी (दि.४) रात्री २ च्या सुमारास घडली. या घटनेची नोंद नेकनूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लिंबागणेश पासून दक्षिणेला पाच किलोमीटर अंतरावर वडवाडी गाव आहे. अभिमान अवचार हे आपल्या पत्नीसह येथे राहतात. ते बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख आहेत. गुरूवारी रात्री दोनच्या सुमरास त्यांच्या घरी आठ ते दहा चोरटे घुसले. अभिमान यांना मारहाण केली. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून व मारहाण करत चोरट्यांनी अवचर कुटुंबाकडून नऊ लाख रुपये रोख व पाच तोळे सोने घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स.पो.नि. शेख मुस्तफा व त्यांचे कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती देताच त्यांनी श्वानपथक व ठसा तज्ञ यांना पाचारण केले. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत. घटनेची माहीती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा : 

Back to top button