चिथावणीखोर वक्तव्य भोवले: शिवसेनेचे बबनराव थोरात यांच्यावर गुन्हा दाखल | पुढारी

चिथावणीखोर वक्तव्य भोवले: शिवसेनेचे बबनराव थोरात यांच्यावर गुन्हा दाखल

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी सोमवारी (दि.१) शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निष्ठा मेळाव्यात चिथावणीखोर वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुध्द हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.२) गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निष्ठा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात थोरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख होण्यासाठी इच्छूक असलेल्यांना आवाहन करीत गद्दारांची वाहने त्यांच्या गावात आल्यानंतर वाहने फोडण्याचे आवाहन केले. गद्दारांची वाहने फोडणाऱ्यांचा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल, असेही यावेळी त्यांनी म्हटले होते.

या प्रकरणात हिंगोलीतील सचिन प्रकाश पवार यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी शांतता भंग व्हावा, असे वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून पोलिसांनी बबनराव थोरात यांच्याविरुध्द शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जिव्हारे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button