बीड : पाचोड येथून तरुणाचे अपहरण; अपहरणकर्त्यांकडून ३ लाखांच्या खंडणीची मागणी | पुढारी

बीड : पाचोड येथून तरुणाचे अपहरण; अपहरणकर्त्यांकडून ३ लाखांच्या खंडणीची मागणी

पाचोड: पुढारी वृत्तसेवा: एका सतरा वर्षीय परप्रांतीय युवकाचे सिनेस्टाईल कारमध्ये बसवून अपहरण केल्याची खळबळजनक घटना पाचोड (ता.पैठण) येथील आठवडे बाजारात घडली. ही घटना रविवारी (दि. ३१) दुपारी उघडकीस आली. दरम्यान, आरोपीकडून ३ लाख रुपयांची खंडणी मागितली जात आहे. या प्रकरणी  पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुकेश राजाराम निगवाल (वय १७, रा. ढोलकट,  ता. नेपानगर, जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश असे अपहरण केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोड (ता.पैठण) येथील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी तोडणीच्या  कामासाठी मुकेश निगवाल आला आहे.  रविवारी त्याने सकाळी  केश कर्तनालयात जाऊन कटींग केली. त्यानंतर तो आठवडे बाजारात फिरायला गेला बाजारातून  परत मोसंबी मार्केटकडे येत असताना तो एका पांढऱ्या रंगाच्या  स्विफ्ट कारमध्ये बसताना काही परप्रांतीय कामगारांना दिसला.

बीड : सासरच्यांनी विवाहितेची हत्या केल्याचा आरोप करत नातेवाईकांचा ठिय्या

परंतु, बराच वेळ उलटल्यानंतर देखील त्याचा काही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या सोबतच्या मित्रांनी नागरिकांच्या मदतीने इतस्त्र शोध घेण्याचा प्रयत्न  केला. मात्र, त्याचा कुठेच काही  थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कामगारांनी ही बाब ठेकेदाराला कळविली. दरम्यान, परप्रांतीय कामगार  कैलास केदार चौहान यांच्या मोबाईलवर रात्री एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने सांगितले की तुमचा साथीदार मुकेश निगवाल याने आमचे तब्बल पन्नास मोबाईल चोरले आहेत. त्यामुळे आमच्याकडून त्याचे अपहरण करण्यात आले आहे.

त्याला सोडवायचे  असेल, तर ३ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. आणि  ते पैसे गेवराई (जि. बीड) येथे आणून द्यावे लागतील, त्याने सांगून फोन कट केला. घाबरलेल्या कैलासने लगेच पाचोड पोलीस ठण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी सदर घटनेचे गांभीर्य  ओळखून सहकाऱ्यांसमवेत  तातडीने परिसरात तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर त्यांनी गेवराई येथील आयआरबीच्या टोलनाक्यावर जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तेव्हा काही  पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार बीडकडे जाताना आढळल्या, या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे करीत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button