दिल्ली वाऱ्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत देण्यात मोठेपण दाखवा : अजित पवार | पुढारी

दिल्ली वाऱ्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत देण्यात मोठेपण दाखवा : अजित पवार

परळी; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई तालुक्यामध्‍ये अनेक ठिकाणी सुमारे ३६०० हेक्टरवर सोयाबीन पिकाचे गोगलगायींनी शेंडे खाऊन नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी ३-४ वेळा पेरण्या करून विविध उपाय केले. मात्र, तरीही गोगलगायींचा प्रादुर्भाव आटोक्यात येईना. या पद्धतीच्या नुकसानीचा पीक विमा निकषांमध्ये समावेश नसून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने गोगलगायीचे नियंत्रण करणे व दुबार पेरणीसाठी जमीन तयार करून पेरणी करणे यासाठी विशेष आर्थिक मदत करण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने याबाबत आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा व राज्य सरकारने या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार हे आज (दि.३१) बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई आदी तालुक्यांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गोगलगायींनी उद्‍ध्वस्त केलेल्या सोयाबीनच्या शेतात जाऊन पाहणी केली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली. यावेळी दिल्ली वाऱ्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत देण्यात मोठेपण दाखवा. तर मंत्रिमंडळ विस्तार नाही, जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत, त्यामुळे पीकविमा, कृषी कर्ज, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अशा अनेक बाबी प्रलंबित असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी नमूद केले.

यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आमदार सतीश चव्हाण, मा. आमदार संजय दौंड, मा. आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, राजकिशोर मोदी, गोविंद देशमुख, ताराचंद शिंदे, दत्ता आबा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, स्थानिक शेतकरी, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

वैद्यनाथ दर्शन

बीड जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर अजित पवार यांनी सकाळी परळीत वैद्यनाथ मंदिरात प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन विधिवत पूजन केले. राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी बळ देण्याची प्रार्थना केल्याचे यावेळी ते म्हणाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button