बीड : केज येथे शेतीपंपांची चोरी करणारे निघाले महाविद्यालयीन विद्यार्थी | पुढारी

बीड : केज येथे शेतीपंपांची चोरी करणारे निघाले महाविद्यालयीन विद्यार्थी

केज; पुढारी वृत्तसेवा : केज येथे रात्रीच्या वेळी गस्त घालत असलेल्या पोलीस पथकाने विहिरीतील मोटारींची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. चार चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चारपैकी तिघे चोरटे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

याबाबतची माहिती अशी की, शनिवारी (दि.२३) रात्रीच्या वेळी केज पोलिसांच्या गस्ती पथकातील पोलीस जमादार अशोक थोरात आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे, बजरंग इंगोले गस्त घालीत होते. यावेळी मध्यरात्री १:३० च्या दरम्यान पोलीस पथकाला शिंदी (ता. केज) येथे एक संशयित वाहन दृष्टीस पडले. त्यांची चौकशी केली असता वाहनात खते व बी-बियाणे असल्याचे सांगितले. मात्र, पोलीस पथकाने पाहणी केली असता वाहनात तीन पाणबुडी पंप आणि वायर कटर, पाइप कापण्यासाठी सॉ ब्लेड, स्क्रू ड्रायव्हर, टेस्टर, पक्कड असे साहित्य आढळून आले. त्यानंतर त्यांना वाहनासह केज पोलीस ठाण्यात आणले.

यावेळी केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी अधिक चौकशी केली असता ते चौघे चोरटे हे धारूर तालुक्यातील मैंदवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले. या चोरट्यांनी पाण्याच्या मोटारी धारूर तालुक्यातील मैंदवाडी परिसरातून चोरून आणल्याची कबुली दिली. हे चौघे सिद्धेश्वर मोहन मैंद, वय (१९ ), ऋषिकेश रावसाहेब मैंद, (वय २१), महेश सखाराम केदार, (वय१९) आणि बालाजी रामेश्वर मैंद (वय१९, सर्व रा. मैंदवाडी ता. धारूर ) येथील आहेत.

चौघांपैकी तीन चोरटे महाविद्यालयात शिकणारे

या प्रकरणी पकडलेल्या चोरट्यांपैकी सिद्धेश्वर मोहन मैंद हा बीड येथील एका महाविद्यालयात बी एस्सी वर्गात शिकत आहे. तर ऋषिकेश रावसाहेब मैंद, आणि बालाजी रामेश्वर मैंद हे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत आणि महेश सखाराम केदार हा शेती करताे. हे चौघेही १९ ते २१ वर्ष वयोगटातील असल्याने ते शिक्षणाऐवजी चोरीच्या मार्गाकडे का वळले असावेत ?, असा तपास पाेलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button