'परभणीतील शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभाग नोंदवावा' | पुढारी

'परभणीतील शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभाग नोंदवावा'

जिंतुर(परभणी); पुढारी वृत्तसेवा: खरीप हंगाम २०२१ साठी कृषी विभागामार्फत पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. तूर व सोयाबीन पिकासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पूर्वी अर्ज सादर करावे लागणार आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकार्‍यांनी दिली.

पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागामध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल.

शेतकरी अधिक उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. हा उद्देश ठेऊन राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येणार आहे.

पीक स्पर्धा विजेत्यांसाठी तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५ हजार, दुसरे ३ हजार तर तिसरे २ हजार रुपये आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १० हजार, दुसरे ७ हजार तर तिसरे ५ हजार रुपये असून विभाग पातळीवर पहिले बक्षीस २५ हजार रुपये, दुसरे बक्षीस २० हजार, तर तिसरे १५ हजार बक्षीस ठेवले आहे.

राज्य पातळीवरचे पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे ४० हजार तर तिसरे ३० हजार रुपये  आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा यासाठी पीक स्पर्धा योजना आखली आहे.

कृषी अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा

अधिक माहितीसाठी आणि पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपले गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर काळे तालुका कृषी अधिकारी जिंतूर यांनी केले आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button