औरंगाबाद : आमदार नारायण कुचेंच्या कारची दुचाकीला धडक; चौघे जखमी | पुढारी

औरंगाबाद : आमदार नारायण कुचेंच्या कारची दुचाकीला धडक; चौघे जखमी

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील बदनापूर अंबड  मतदारसंघातील भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या कारला दुचाकी येऊन धडकली. या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबाद – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव, दर्गा (ता.अंबड) फाट्याजवळ आज (दि.२२) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. सर्व जखमींना स्वतः आमदार नारायण कुचे यांनी आपल्या वाहनातून  पाचोड येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. यातील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविले.

राजू राठोड (वय ४५), सविता राठोड, (वय ३५), रोहित राठोड, (वय ८)  रोहन  राठोड, (वय १०) रा. बारसवाडा (ता. अंबड) असे जखमी झालेल्या दाम्पत्य आणि लहान मुलांची नावे आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नारायण कुचे हे  वडीगोद्रीकडून औरंगाबादच्या दिशेने येत होते. यावेळी झिरपेकडे जाण्यासाठी डोणगाव फाट्यावर वळण घेणाऱ्या दुचाकीला त्यांच्या वाहनाने जोराची धडक दिली. यावेळी दुचाकीवरील राजू राठोड, त्यांची पत्नी सविता राठोड, लहान मुले रोहित राठोड, रोहन  राठोड हे चौघे जण जखमी झाले. त्यांना आमदार कुचेकर यांनी स्वतःच्या कारमधून पाचोड येथील रुग्णालयात दाखल केले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले. या अपघाताची नोंद गोंदी (ता. अंबड) पोलीस ठाण्यात झाली.

आमदार नारायण कुचे यांच्या वाहनाला दुसऱ्यांदा अपघात….

भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या वाहनाला पाच वर्षापूर्वी देखील अपघात झाला होता. स्कॉर्पिओचे टायर फुटून एका शाळेच्या वाहनाला धडक दिली होती. या अपघातात आमदार कुचे यांच्या डोक्याला आणि मानेला जबर मार लागला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button