बीड : मांजरा पुलावरच्या रस्त्यावर खड्डे आणि चिखलामूळे अपघात झाला तर त्यास जबाबदार कोण? | पुढारी

बीड : मांजरा पुलावरच्या रस्त्यावर खड्डे आणि चिखलामूळे अपघात झाला तर त्यास जबाबदार कोण?

केज (बीड), पुढारी वृत्‍तसेवा : बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याला जोडणाऱ्या मांजरा पुलावरचा रस्ता हा खड्डे आणि चिखलामुळे अत्यंत धोकादायक झाला आहे. मागील चार वर्षा पासून या पुलाचे काम सुरू असल्याने जुन्या रस्त्याकडे कुणाचे लक्ष नसून काम करणाऱ्या कंपनीने पर्यायी रस्ता देखील केला नाही. तर या रस्त्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसून जर अपघात झाला आणि जीवित हानी झाली तर याची जबाबदारी कोण स्वीकारणार? असा सवाल जनतेतून उपस्‍थित केला जात आहे.

केज तालुक्यातून जाणारा खामगाव-सांगोला राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-सी यावर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याला मांजरा नदीवर पूल आहे. हा रस्ता पूर्वी राज्य रस्ता होता. तो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत झालेला आहे. सन २०१७ पासून या रस्त्याचे काम मेगा इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग कंपनी (मेल) ही करीत आहे. मांजरा पुलाचे काम सुरू आहे. परंतु अद्याप त्यांनी पर्यायी रस्ता केलेला नसल्याने जुन्याच पुला वरून रस्त्याने वाहतूक सुरू आहे.

हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. रस्त्यावर नुसते खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यात पाणी आणि चिखल झालेला आहे. या रस्त्याने अवजड वाहने, आणि दुचाकी वाहने चालविने म्हणजे एक प्रकारचे दिव्य आहे. तसेच पुलाच्या आणि रस्त्याच्या बाजुला सुमारे २५ ते ३० फूट खोल खड्डे आहेत. त्यामुळे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात किंवा चिखलामुळे वाहने घसरत आहेत. त्यामुळे दुर्दैवाने मोठा अपघात झाल्यास जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्या पुलावरून वाहतूक सुरू आहे त्या पुलाचे कठडे देखील तूटलेले आहेत. त्यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी शासनाने खररदारी घेण्याची मागणी होत आहे.

लोकप्रतिनिधी गप्प का ?

दोन जिल्ह्याना जोडणाऱ्या या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, नागरिक आणि वाहन चालक यांचे होणारे प्रचंड हाल असताना दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कसे दिसत नाहीत ? आणि ते गप्प का आहेत ? असा सवाल जनतेतून केला जात आहे.

Back to top button