तामसा ठाण्यावर हल्ला; 27 जणांना सक्‍तमजुरी | पुढारी

तामसा ठाण्यावर हल्ला; 27 जणांना सक्‍तमजुरी

नांदेड, पुढारी वृत्तसेवा ः एका बालकाच्या मृत्यूनंतर तामसा पोलिस ठाण्यावर दगडफेक करून हल्ला केल्याच्या आरोपावरून 27 जणांना येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश शशीकांत बांगर यांनी पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 11 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना चार वर्षांपूर्वी हदगाव तालुक्यातील आष्टी येथे घडली होती. या खटल्याची अधिक माहिती अशी की, 2018 मध्ये भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद नांदेड येथे उमटले होते. याची पुनरावृत्‍ती हदगाव तालुक्यातील आष्टी येथे घडवून एका बालकाचा मृत्यू झाला होता. या संदर्भात काही लोक निवेदन देण्यासाठी तामसा पोलिस ठाण्यात गेले होते. या दरम्यान, या लोकांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी करत ठाण्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक पोलिस किरकोळ जखमी झाले. तसेच पोलिस ठाण्याचेही नुकसान झाले होते. जमावाने पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली होती. याबाबत तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक रावसाहेब पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण 27 जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी सपोनि एम.बी. गोमारे आणि सुनील माने यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान या खटल्यात सहा साक्षीदारांचे जवाब नोंदविण्यात आले. उपलब्ध पुराव्यानुसार न्यायाधीश बांगर यांनी 27 जणांना दोषी ठरवत प्रत्येकी 5 वर्षांची सक्तमजुरी आणि 11 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या खटल्यातील दोन आरोपी फरार असून न्यायालयाने त्यांनाही शिक्षा ठोठावली. अमोल रावळे, जयकिशन रावळे, तानाजी अचलखांब, रवी वाघमारे, संदीप हनुवते, अष्टदीप हनुमते, धम्मवीर हनुवते, नितीन जाधव, संदीप जाधव, दीपक जाधव, नितीन कंधारे, देवानंद जाधव, सुरेश शेळके, रवींद्र शेळके, विनोद शेळके, मारोती तुपसाखरे, राजू नारळे, मधुकर नारळे, अ अनिल वाघमारे, कचरु वाठोरे, अक्षयकुमार नारळे, पांडुरंग नरवाडे, संघपाल कांबळे, प्रमोद वाठोरे, मिलिंद कांबळे, रमेश कदम, धम्मपाल कदम अशी शिक्षा
सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत

Back to top button