वाशिम : शेतकऱ्याची बियाणे कंपनीकडून फसवणूक; ४ लाखांचे नुकसान | पुढारी

वाशिम : शेतकऱ्याची बियाणे कंपनीकडून फसवणूक; ४ लाखांचे नुकसान

वाशिम ; अजय ढवळे : वाशिम जिल्ह्यातील आसरा पार्डी येथील प्रयोगशील शेतकरी शिवाजी वानखेडे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात सकाटा या कंपनीच्या फ्लॉवर आणि पत्ता कोबीची लागवड केली. मात्र अडीच महिने होऊन सुद्धा कोबीच्या पिकाला फुलच आले नसल्याने बियाणे कंपनीशी या संदर्भात, संपर्क केला. मात्र यावर शेतकऱ्याला उडवा उडवीचे उत्तरे कंपनीकडून देण्यात आल्‍याने शेतकऱ्याची फसवणूक झाल्‍याचा प्रकार समोर आला आहे.

त्यानंतर शेतकऱ्याने कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वाशिम तालुक्यातील आसरा पार्डी येथील शिवाजी वानखेडे यांच्याकडे 18 एकर शेती आहे. वानखेडे हे वर्षभर भाजीपाला शेती करतात. यंदा त्यांनी सकाटा या कंपनीची एक एकर फ्लॉवर आणि एक एकर पत्ता कोबीची लागवड केली. मात्र या दोन्ही कोबीला फुलचं लागले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्याची फसवणूक झाल्‍याचे समाेर आले आहे.

मागील दोन वर्षात कोरोनामुळे भाजीपाला पिकाच मोठं नुकसान झाल होत. आता लॉकडाऊन कमी झाल्यामुळे त्यांना या फ्लॉवर आणि पत्ता कोबी मधून चांगल्या उत्पन्नाची अशा होती, मात्र बियाणं बोगस निघाल्याने लागवड खर्च तर वाया गेलाच शिवाय 4 लाख रुपये मिळणार उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

बियाणं उगवलं नाही किंवा बोगस निघालं तर त्‍याची जबाबदारी कंपनीची असते, मात्र कंपनीकडे तक्रार केल्यानंतर कंपनी कडून शेतकऱ्यांना धमकावून तुमच्याकडून काय होते ते करा असे उत्तर देण्यात आले. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागात तक्रार केली. मात्र पाच दिवस उलटूनही कृषी विभाग अजून शेतात पोहचला नसल्याने या शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Back to top button