हिंगोली : कोवळ्या पिकांवर वानू, गोगलगायींचा हल्‍ला ; पिकांची नासाडी, शेतकर्‍यांच्या चिंतेत भर | पुढारी

हिंगोली : कोवळ्या पिकांवर वानू, गोगलगायींचा हल्‍ला ; पिकांची नासाडी, शेतकर्‍यांच्या चिंतेत भर

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : अगोदरच अत्यल्प पावसामुळे पिके धोक्यात आहेत. त्यातच आता कोवळ्या पिकांवर अजून एक संकट घोंगावत आहे. सोयाबीनसह इतर पिकांवर वानू, गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला आहे. हे कीटक कोवळी पिके फस्त करीत असल्याने शेतकर्‍यांसमोर नियंत्रणाचे आव्हान उभे राहिले आहे.

जिल्हात तब्बल अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होईल, असा अंदाज आहे. त्या खालोखाल कपाशी, हळद, उडीद, मूग व तुरीचा पेरा अपेक्षित आहे. पावसास सुरूवात होऊन एक महिना उलटला तरी अजूनही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. अत्यल्प पावसावर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहेत. जवळपास 60 टक्के पेरण्या पुर्ण झाल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आला आहे. तर उर्वरित पेरण्या सध्या सुरू आहेत.

पिकांची उगवण होताच पिकावर वान, गोगलगायी तुटून पडत आहेत. पानांसह थेट कोवळ्या पिकांचा देठच कुर्तडून टाकत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या गोगलगायीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परंतु शेतशिवारात कृषी विभागाचे कर्मचारी फिरकतच नसल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे. या कीटकाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. मात्र, पाऊस होत नसल्याने अळ्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

कृषी कर्मचार्‍यांचे मार्गदर्शन कागदावरच

शेतकर्‍यांना अत्याधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन व्हावे. या दृष्टीने कृषी विभाग कार्यरत आहे. परंतू, कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांकडून मात्र केवळ कागदावरच मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे चित्र मागील अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. केवळ खरीप हंगामाच्या तोंडावर गावभेटी देऊन चार शेतकर्‍यांना बीजप्रक्रियेसह इतर माहिती देत गावातून निघून जाण्यावरच कर्मचार्‍यांचा भर असतो. परिणामी ऐन वेळी उद्भवणार्‍या समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी उपलब्धच होत नाहीत.

हेही वाचा

Back to top button