उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना अभेद्यच; पुनर्बांधणीसाठी हालचाली | पुढारी

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना अभेद्यच; पुनर्बांधणीसाठी हालचाली

उस्मानाबाद; भीमाशंकर वाघमारे : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये मिळून 35 पेक्षा अधिक नगरसेवक नाहीत; जिल्हा परिषदेत 11 सदस्य, पंचायत समितीतही 25 पेक्षा अधिक सदस्य नाहीत तरीही जिल्ह्याचे खासदार शिवसेनेचे आहेत. त्यात 3 आमदार आहेत. हे असे गमतीदार चित्र असले तरी बंडखोरीच्या वादळानंतर मात्र जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य राहिल असेच चित्र आहे. दोन्ही आमदारांच्या समर्थनार्थ त्यांच्या मतदारसंघातील मूळ शिवसैनिक, जुने पदाधिकारी तसेच जिल्ह्यातूनही कोणी पुढे न आल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.

जिल्ह्यातून शिवसेनेचे तीन आमदार आहेत. यात जिल्हाप्रमुख कैलास पाटील हे उस्मानाबाद-कळंबचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तर प्रा. तानाजी सावंत भूम-परंडा- वाशी तालुक्याचे प्रतिनिधीत्व करतात. उमरगा-लोहारा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले विजयी झाले आहेत. यातील प्रा. सावंत व ज्ञानराज चौगुले हे दोन आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील आहेत.

यातील उमरगा मतदारसंघाचा विचार करता येथे अजूनही माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा प्रभाव आहे. आमदार चौगुले हे प्रा. गायकवाड यांचे शिष्यच आहेत. बंडाला प्रा. गायकवाड यांचा पाठिंबा असल्याचे आमदार सांगत असले तरी प्रा. गायकवाड यांनी मात्र उध्दव ठाकरे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. एका बाजूला हे चित्र असताना दुसरीकडे उमरग्यात आमदारांविरोधात जे आंदोलन झाले त्यात प्रा. गायकवाड गटाचे कोणीच नव्हते. या मतदारसंघातील राजकारणाचे स्थानिक संदर्भ पाहता काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व प्रा. गायकवाड यांच्यातील राजकीय लढाईनुसार निवडणुकीची समीकरणे निश्‍चित असतात. त्यामुळे येथे शिंदे गट व मूळ शिवसेना हा विषय बाजूलाच असेल.

परंडा मतदारसंघातही काहीसे असेच चित्र असेल. सलग तीन वेळा विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटेंना प्रा. सावंत यांनी पराभवाची धूळ चारली. त्या विजयात शिवसेनेच्या निष्ठावंतांचे मोठे योगदान होते. माजी आमदार ज्ञानेश्‍वर पाटील यांच्यासह सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी लढा देत हा विजय मिळविला. प्रा. सावंत यांनी तिन्ही तालुक्यांत साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वत:ची ताकदही उभी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. बंडानंतर त्यांच्या विरोधात मूळ शिवसैनिकांनी आंदोलन करीत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिकास्त्र सोडले. यानंतर मात्र लागलीच सावंत यांच्या समर्थनार्थ त्यांच्या गटाने मोर्चा काढला. येथे मूळ शिवसेना विरुध्द सावंत गट असे चित्र यापुढेही राहील. प्रा. सावंत यांचे मंत्रीपदी नाव निश्‍चित मानले जाते. त्यामुळे जिल्ह्यावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न प्रा. सावंत यांचा असेल.
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे ‘मातोश्री’वर वजन असलेले नेते आहेत. त्यातच त्यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याजवळही चांगले बस्तान बसवले आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच खा. राजेनिंबाळकर यांना चारही विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य होते. खा. राजेनिंबाळकर हे शिवसेनेसोबतच आहेत. ते शिंदे गटासोबत जाण्याची अजिबात शक्यता नसल्याचे त्यांचे जवळचे कार्यकर्ते ठामपणे सांगतात. त्यात आता जिल्ह्याची शिवसेनेची घडी पुन्हा व्यवस्थित बसविण्याची जबाबदारी खासदार म्हणून राजेनिंबाळकरांवरही असेल.

उस्मानाबादचे आ. कैलास पाटील हे जिल्हाप्रमुख व तरुण नेते आहेत. त्यामुळे खा. राजेनिंबाळकरांच्या साथीने तेही आता जिल्ह्यात शिवसेनेची उभारणी नव्या दमाने करतील, असा विश्‍वास शिवसेनेच्या राज्य नेतृत्वाला आहे. या दोन्ही नेत्यांची कसोटी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच लागणार आहे. त्यामुळे तालुकानिहाय बैठका घेत शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठीचे प्रयत्न त्यांना करावे लागणार आहेत.

मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतिक्षा..!

कुंपणावरचे काही नेते, गुत्तेदारी करणारे बरेच पदाधिकारी मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्याला मंत्रीपद मिळालेच तर यातील काही नेते नक्‍कीच पक्षांतर करतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button