शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी राहणार, उद्धव ठाकरेंचा हिंगोलीतील शिवसैनिकांशी संवाद | पुढारी

शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी राहणार, उद्धव ठाकरेंचा हिंगोलीतील शिवसैनिकांशी संवाद

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत कोण आले, कोण गेले याची आता पर्वा नाही. तुमच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी करणार असून, लवकरच शिवसैनिकांच्या भेटीसाठी येणार असल्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज हिंगोली जिल्हयातील शिवसैनिकांना फोनवरून बोलताना दिले.

येथील शासकिय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, पदाधिकारी डॉ. रमेश शिंदे, परमेश्वर मांडगे, दिलीप बांगर, राजू चापके, संदेश देशमुख, अ‍ॅड. रवी शिंदे, उध्दव गायकवाड, अंकुश आहेर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये शिवसैनिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. हिंगोली जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे सर्वांनीच यावेळी सांगितले. यावेळी आनंदराव जाधव यांनीही मार्गदर्शन करतांना जिल्ह्यात शिवसेना बळकट करणार असून पुढील दोन ते तीन दिवसांत जिल्हा प्रमुखांची निवड होणार असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच येणार भेटीला

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ज्या लोकांना आपण काही दिले ते सर्व सोडून गेले. मात्र, ज्यांनी आपल्याला दिले ते मात्र सोबत राहिले. आता मला कुठल्याही गोष्टीची चिंता नाही. तुमच्या सर्वांच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी करणार आहे. त्यासाठी जिल्हा कार्यकारणीची बैठक मुंबई येथे बोलावण्यात आली आहे. त्यानंतर मी हिंगोलीत येणार असून, तुमची सर्वांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात काही कारणामुळे मला तिकडे येता आले नाही. मात्र, आता पुन्हा उभा राहिलो असून, कुठल्याही परिस्थितीत लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button