जालना : वडीगोद्री परिसरात आठ दिवसांनंतर पावसाची हजेरी | पुढारी

जालना : वडीगोद्री परिसरात आठ दिवसांनंतर पावसाची हजेरी

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता पावसाने हजेरी लावली. मध्यम स्वरुपाच्या या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पावसामुळे शेतकर्‍यांत आशा पल्लवित झाल्या आहेत.

वडीगोद्री येथे शुक्रवारी बाजार असल्याने व्यावसायिक व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी होती. याचवेळी अचानक पाऊस आल्याने बाजारात व्यापारी व नागरिकांची काही काळ पळापळ झाली. बाजारात उघड्यावर माल विक्री करणार्‍या किराणा, कपडे व इतर व्यावसायिकांना माल भिजू नये यासाठी प्लास्टिक कव्हर झाकावे लागले.

संपूर्ण जून महिन्यात वडीगोद्री परिसरात केवळ मध्यम स्वरूपाचे दोनच पाऊस झाले आहेत. अपुर्‍या पावसावर शेतकर्‍यांनी कापूस, तूर, सोयाबीन, मूग आदी पिकांची पेरणी व लागवड केली आहे. पेरणी व लागवड झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली होती. त्या शेतकर्‍यांना पेरणी वाया जाण्याची भीती होती. शुक्रवारी सायंकाळी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांत समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button