हिंगोली : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या २ तरुणांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू | पुढारी

हिंगोली : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या २ तरुणांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

हिंगोली, पुढारी वृत्‍तसेवा : वसमत ते कौठारोड भागात पोलिस भरतीच्या सरावासाठी गेलेल्या दोन तरुणांचा वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. अनिल भगवान आम्ले (वय-२३ ) गणेश परमेश्वर गायकवाड (वय-१८ ) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

राज्यात सध्या पोलिस भरती प्रक्रिया व सैन्य भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यामूळे तरुण मंडळी दररोज पहाटे चार वाजल्यापासूनच भरतीचा सराव करतात. वसमत शहरातून किमान ५० ते १०० भरतीचा सराव करीत आहेत. दरम्यान, आज पहाटे शहरातील काही तरुण कौठा रोडवर धावण्याच्या सरावासाठी गेले होते. यावेळी काही तरुण समोर धावत होते तर अनिल आम्ले व गणेश गायकवाड हे दोघे सोबत धावत होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दोघांनीही जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहन चालकाने वाहनासह पळ काढला.

तसेच, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सोबत असलेल्या तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तरुणांनी रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

हेही वाचा  

Back to top button