बीड : पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न | पुढारी

बीड : पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न

केज, पुढारी वृत्तसेवा : बेदरकारपणे वाहन चालवीत असल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन वाहनासह पोलिस ठाण्यात आणले. यावेळी सदरील चालकाने पोलिसांच्या अंगावर वाहन घालत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करत वाहनास पुन्हा चालकाला ताब्यात घेतले.

दीपक कदम हा त्याच्या ताब्यातील कार (क्र. एम एच 03-बी सी 5481) भरधाव वेगत चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याला आडवून वाहनास पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात त्याची चौकशी करत असताना दीपक कदम याने पोलिस ठाण्यातून गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस नाईक गोरख फड यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर चालकाने वाहन न थांबवता पोलिस कर्मचार्‍यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करत वाहनासह पळून गेला. तो भरधाव छत्रपती शिवाजी चौकातून कळंबच्या दिशेने गाडी पळवू लागला.

यावेळी पोलिस नाईक गोरख फड, पोलिस जमादार राम यादव आणि कर्मचार्‍यांनी एका खासगी वाहनाने त्याचा पाठलाग केला. तो साळेगावपासून पुढे माळेगाव जवळ गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने माळेगावच्या शिवाजी चौकात अडथळे लावून कार आडवली. त्यानंतर सदर गाडी व त्याचा चालक कदम याच्यावर गुन्हा दाखल केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button