औरंगाबाद : भुमरे समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी | पुढारी

औरंगाबाद : भुमरे समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपणारा सेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे. याला कोणीही भगदाड पाडू शकत नाही. येणार्‍या काळात शिवसैनिक पुन्हा भगवाच पैठण विधानसभा मतदारसंघावर फडकवतील. शिवसेना धगधगती आग असून, तिच्याशी खेळण्याचा प्रयत्न बंडखोरांनी करू नये. तालुक्यात विनाकारण दंडेलशाहीचे राजकारण करणार्‍यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले. दरम्यान, पैठण येथे मंगळवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, युवा सेना जिल्हाप्रमुख किशोर चौधरी यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर करण्यात आले. तर नवीन तालुकाप्रमुख म्हणून बिडकीनचे मनोज पेरे यांची निवड घोषित करण्यात आली.

मेळाव्याला संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार अंबादास दानवे, आमदार अ‍ॅड. मनीषा कायंदे, महिला आघाडीच्या राखीताई परदेशी, युवा सेना तालुकाध्यक्ष विकास गोर्डे, शहराध्यक्ष अजय पळकर, माजी नगरसेवक प्रकाश वानोळे, राजुशेठ परदेशी, सरपंच अँड . किशोर वैद्य, पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ, माजी सरपंच अशोक धर्मे, कुमार काळे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार दानवे म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला आहे. पैठण तालुक् यासाठी वॉटर ग्रीडसारखी योजना मंजूर केली आहे. एवढे सर्व काही सतानाही शिवसेनेतून भुमरे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे येणार्‍या काळात शिवसेनेचा भगवा पैठण विधानसभावर फडकणार असे यावेळी दानवे म्हणाले.

तालुक्यातील घराणेशाही यानंतर चालणार नसून सर्वसामान्य शिवसैनिकांना घेऊन पुन्हा शिवसेना उभा करणार असल्याचेही यावेळी दानवे म्हणाले .तसेच त्रिवेदी म्हणाले की शिवसेना पक्ष शिवसेनेच्या कार्यकत्र्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील त्यामुळे कार्यकत्र्याने कोणालाही भीक घालू नये. यावेळी आमदार मनीषा कायंदे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर , जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आदींनी मार्गदर्शन केले. तर यावेळी मनोज पेरे पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी राजू शेठ परदेशी, अजय परळकर यांच्यासह आदींनी मेहनत घेतली. मेळाव्याला उपस्थित न राहिलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकासह अंगीकृत संघटनेचे पदाधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करीत लवकरच आणखी नियुक्त्या करणार असल्याचे नेते खैरे म्हणाले.

 

पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच सर्व पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास टाकला. त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. सामान्य शिवसैनिक आगामी काळात पैठण तालुक्यात भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
– मनोज पेरे,
नूतन तालुकाध्यक्ष, पैठण

Back to top button