परभणी : निकृष्ट बियाणेप्रकरणी विक्रेत्याविरुद्ध कारवाई | पुढारी

परभणी : निकृष्ट बियाणेप्रकरणी विक्रेत्याविरुद्ध कारवाई

परभणी, पुढारी वृत्तसेवा : निकृष्ट प्रतीचे बियाणे विकणार्‍या बियाणे विक्रेत्याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कृषी अधिकार्‍यांनी या बियाणाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेला पाठविले. या बियाणांची विक्री बंद करण्याचे आदेशही विक्रेत्यास देण्यात आले आहेत.

नवा मोंढा भागातील स्वाती अ‍ॅग्रो एजन्सीजमधून मंगळवारी सकाळी एका शेतकर्‍याने प्रगती प्रीमियम कंपनीचे बियाणे विकत घेतले होते, परंतु हे बियाणे बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा प्रकार सांगितला. त्यावर ढगे यांनी तालुका कृषी अधिकारी बनसावडे यांना या दुकानात थेट पाहणीसाठी बोलावले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते व दुकानदार यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. बनसावडे यांनी या बियाणांची पाहणी करून त्याचे नमुने जप्त करीत प्रयोगशाळेला पाठविणार असल्याचे सांगितले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश् वासन त्यांनी शेतकर्‍यांना दिले. तसेच संबंधित विक्रेत्यास प्रगती प्रीमियम या नावाच्या बियाणांची विक्री बंद करण्याचे आदेशही बजावले आहेत.

Back to top button